लवकरच धावणार एसी लोकल, ७५ नवीन फेऱ्या, एलिव्हेटेड रेल्वे, कल्याण-कर्जत तिसरा रेल्वेमार्ग अशा घोषणा रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी केल्या असल्या तरी मुंबईकरांनो सावधान. या भूलथापा असून पुरेशी आर्थिक तरतूद आणि पायाभूत सुविधा नसल्याने त्या दरवर्षीप्रमाणे आश्वासनांचे गाजरच ठरणार आहेत. मुंबईतील रेल्वेस्थानकांवर ५० सरकते जिने आणि अन्य घोषणा गेल्यावर्षीही झाल्या. पण प्रत्यक्षात काहीच झालेले नाही, हे ध्यानात ठेवा!
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करून एमयूटीपी प्रकल्प लवकर पूर्ण केला जाईल, अशी अपेक्षा होती. पण तो रेंगाळत चालला आहे. लवकरात लवकर नवीन रेक उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही. निधीअभावी हे वेळापत्रक कोलमडलेलेच आहे. त्यामुळे उपनगरी फेऱ्यांमध्ये वाढ झालेली नाही. एसी लोकलची नुसतीच चर्चा सुरू आहे. ५० रेल्वेस्थानकांवर सरकत्या जिन्यांचे गेल्यावर्षी दाखविलेल्या गाजराचीही तीच गत आहे. एसी लोकल आणि ७२ नवीन फेऱ्यांची अवस्थाही तशीच होईल, अशीच शंका आहे.
चर्चगेट-डहाणू रेल्वेमार्ग तयार होऊनही थेट गाडीची घोषणा करण्यासाठी रेल्वेमंत्री कोणत्या मुहूर्ताची वाट पहात आहेत, हे त्यांचे त्यांनाच माहीत. कल्याण ते कर्जत आणि कसारा रेल्वेमार्ग चौपदरी करण्याची मागणी वर्षांनुवर्षे अपूर्णच आहे. नवीन मार्गासाठी आधीच्या मार्गालगत जमीनही उपलब्ध आहे. तरीही नवीन मार्गासाठी पावले टाकली गेली नाहीत. कुर्ला-ठाणे सहापदरी मार्गाचा अनेक वर्षांचा अनुभव मुंबईकरांना आहेच.
मुंबईतून कोकणात हजारो प्रवासी ये-जा करतात. या मार्गावरील सर्व गाडय़ा प्रवाशांनी ओसंडून वहात असताना कोकणात जाण्यासाठी नवीन गाडय़ा वाढलेल्या नाहीत. कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण केले नसल्याने या मार्गावरील वाहतूक प्रचंड वाढूनही प्रवाशांना तासनतास खोळंबा होतो. तरीही कोकणातील प्रवाशांचा कोणताही विचार रेल्वेमंत्र्यांनी केलेला नाही. मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक दररोज प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. गेल्या कित्येक वर्षांत त्यांच्यासाठी नवीन गाडी सुरू करण्यात आलेली नाही. अन्य राज्यांतील प्रवाशांसाठी नवीन गाडय़ांची घोषणा होते. पण महाराष्ट्रांतर्गत प्रवासासाठी नवीन गाडय़ा सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना कोणत्या अडचणी आहेत. हा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. राज्यातील खासदार आक्रमक नसल्याने मुंबई, कोकण, पुणे नाशिकच्या प्रवाशांच्या तोंडाला पानेच पुसण्याची परंपरा रेल्वेमंत्र्यांनी कायम ठेवली आहे.
अर्धीमुर्धी आश्वासनेही पूर्ण होण्याची शक्यता कमीच!
लवकरच धावणार एसी लोकल, ७५ नवीन फेऱ्या, एलिव्हेटेड रेल्वे, कल्याण-कर्जत तिसरा रेल्वेमार्ग अशा घोषणा रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी केल्या असल्या तरी मुंबईकरांनो सावधान. या भूलथापा असून पुरेशी आर्थिक तरतूद आणि पायाभूत सुविधा नसल्याने त्या दरवर्षीप्रमाणे आश्वासनांचे गाजरच ठरणार आहेत. मुंबईतील रेल्वेस्थानकांवर ५० सरकते जिने आणि अन्य घोषणा गेल्यावर्षीही झाल्या. पण प्रत्यक्षात काहीच झालेले नाही, हे ध्यानात ठेवा!
First published on: 27-02-2013 at 04:45 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Half promise fullfillness possibilities are less