गेले तीन आठवडे पावसाची सतंतधार सुरू असल्याने ठाणे जिल्ह्य़ातील अनेक शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत. ज्यांनी पेरण्या केल्या, त्या मुसळधार पावसामुळे कुजल्या. त्यांना दुबार पेरण्या कराव्या लागणार आहेत. अनियमित पाऊस, वाढलेली मजुरी, खते, बियाणे आणि अवजारांचे वाढलेले दर याचा ताळमेळ बसणे कठीण असल्याने ठाणे जिल्ह्य़ातील निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी त्यांची जमीन यंदा ओसाड ठेवणेच पसंत केले आहे.
ठाणे जिल्ह्य़ाचा एकेकाळी भाताचे कोठार असा लौकिक होता. ठाणे जिल्ह्य़ात भात पिकाचे एकूण क्षेत्र १ लाख ३८ हजार हेक्टर इतके आहे. त्यातील अध्र्या टक्का क्षेत्रही ओलिताखाली (सिंचन) नाही. संपूर्णपणे पावसावरच ही भातशेती अवलंबून आहे. यंदा २ जूनपासून कोसळणाऱ्या पावसाने जराही उसंत घेतलेली नाही. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांच्या पेरण्या कुजल्या. काही शेतकऱ्यांना तर अद्याप पेरण्या करताच आलेल्या नाहीत. दुबार पेरणीसाठी अनेकांना महागडे बियाणे खरेदी करावे लागले. आता जून संपत आला तरी पाऊस उघडीप द्यायला तयार नाही. उशिरा पेरण्या केल्यानंतर त्यावर रोगराई येण्याची शक्यता असते. एवढय़ा अडचणींमधून पीक घेतलेच, तरी भाताला फारसा भावही मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्य़ातील निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून भातशेतीस रामराम ठोकला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा