महाराष्ट्रातील लोकसभेच्या निम्म्या जागांचे भवितव्य ठरविण्याची ताकद दलित व अल्पसंख्यांक समाजात असून रिपब्लिकन पक्षाची पारंपरिक प्रतिमा बदलून सर्वाना स्वीकारार्ह उमेदवार देण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुका राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने खुल्या मतदार संघातून लढविण्यात येतील, असे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी जाहीर केले आहे.
पक्षाच्या केंद्रीय व राज्य कार्यकारिणीच्या संसदीय मंडळाची बैठक येथे झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. खुल्या मतदार संघातून लढताना सर्व जाती, जमाती, धर्मातील उमेदवारांना समान संधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी १३ मतदार संघांमध्ये दलितांची लोकसंख्या २० टक्यांहून अधिक आहे. त्यात ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, औरंगाबाद, नागपूर, भंडारा, अमरावती, अकोला, उस्मानाबाद यासारख्या मतदार संघांचा समावेश आहे. तसेच अल्पसंख्यांकांचे वर्चस्व असलेले मतदारसंघ डझनभर असून त्यात भिवंडी, धुळे, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण-मुंबई, औरंगाबाद यासारख्या मतदार संघांचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभेच्या निम्म्या जागांचे भवितव्य दलित व अल्पसंख्यांक समाजच ठरविणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून पूर्वतयारी आधीपासूनच सुरू झाली असून मतदारसंघ आणि सक्षम उमेदवारांच्या निवडीसाठी जिल्हानिहाय चाचपणी सध्या सुरू आहे. दलित व अल्पसंख्यांक समाजातील प्रतिनिधींचा लोकसभा आणि विधानसभेत शिरकाव होऊ न देण्याच्या मुद्यावर जवळपास सर्वच प्रस्थापित पक्षांचे एकमत असते, असा आरोपही कटारे यांनी केला. महाराष्ट्रात दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा अंमलबजावणीच्या पातळीवर निष्प्रभ करण्यात आल्याने त्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader