चारसूत्री पध्दतीने आजरा घणसाळ वाणांच्या भाताची आदर्शवत लागण करण्याबरोबरच हंबीरराव भोसले यांनी केलेले नियोजनबध्द पीक व्यवस्थापन इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी असल्याचे समाधान कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी व्यक्त करून भोसले यांच्या विविध यशस्वी पीक पध्दतीचा प्रसार कृषिखात्याच्यावतीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
खोडशी (ता. कराड) येथील प्रयोगशील शेतकरी हंबीरराव भोसले यांच्या भात पिकासह फळबाग लागवड व इतर शेतातील प्रयोगास कृषी आयुक्त दांगट यांनी भेट दिली. या वेळी यशोदा भोसले, कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे, जिल्हा अधीक्षक कृषी प्रतापसिंह कदम, आत्मा प्रकल्प संचालक गणेश घोरपडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, उपविभागीय कृषी अधिकार शरद दोरगे, चांगदेव बागल, तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद मांगले आदी उपस्थित होते.
भात पीक पाहणीवेळी उमाकांत दांगट यांनी चारसूत्री भात पध्दतीसह पीक व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांसह कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आजरा घणसाळ भाताच्या पिकाची पाहणी केल्यानंतर हंबीरराव भोसले यांच्या हरभरा, साग, आंबा, ऊस यासह इतर आदर्शवत शेतीचा बँड्र म्हणून प्रसार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली. या वेळी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी दशपर्णी आर्क निर्मिती, जीवामृत आदी प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्पाची पाहणी केली. शेतकऱ्यांनी दरवर्षी सोयाबीन, भात, भुईमूग यासारख्या पिकांच्या स्वत:कडील बियाणांचा पेरणीसाठी वापर करावा. सरळ वाणाच्या बियाणाची दरवर्षी बदल करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी बियाणे येण्याची वाट न बघता बियाणांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबविला पाहिजे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांनी पुढाकार घेण्याचे आवाहन दांगट यांनी केले. यावेळी गावातील प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब पाटील, सुरेश भोसले, हणमंत भोपते, दिलीप जाधव, निवास पाटील, संभाजी भोसले आदींसह शेतकरी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा