कोणताही गुन्हा करताना गुन्हेगार एखादा तरी सुगावा मागे सोडतोच, असे म्हटले जाते. नेमका हाच सुगावा धरत पोलिसांच्या तपासाची दिशा ठरत असते. मुंब्रा परिसरातील एका चार वर्षांच्या बालकाचा अपहरणाचा गुन्हा मात्र अपहरणकर्त्यांच्या गफलतीमुळेच उघडकीस आला. पोलिसांच्या भयापोटी चौघांपैकी एका अपहरणकर्त्यांने अपहरण केलेल्या मुलास सुखरूप घराबाहेर सोडले खरे, मात्र त्याची माहिती इतर तिघांपर्यंत पोहोचलीच नाही. ज्याचे अपहरण झाले तो मुलगा सुखरूप घरी परतला खरा, मात्र याविषयी अनभिज्ञ असलेल्या तिघांनी त्याच्या सुटकेसाठी खंडणी मागणे सुरूच ठेवले. या गफलतीमुळे चौघेही आरोपी पोलिसांच्या सापळ्यात सापडले आणि अपहरणकर्त्यांमधील विसंवादाचा एक गमतीदार किस्सा पुढे आला.
मुंब्रा भागात राहणारे जल्लउद्दीन इम्तियाज खान (४७) यांचा दुधाचा व्यवसाय आहे. २ एप्रिल रोजी त्यांचा हमीद राजा हा चार वर्षीय मुलगा घराबाहेर खेळत असताना त्याचे अपहरण झाले. या प्रकरणी ४ एप्रिलला जल्लाउद्दीन यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात मुलगा हरविल्याची तक्रार दिली होती. त्याच दिवशी सायंकाळी जलालुद्दीन त्यांना दूरध्वनीवरून मुलाच्या सुटकेसाठी चार लाखांच्या खंडणीची धमकी अपहरणकर्त्यांनी दिली. तसेच कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात त्यांना रात्री पैसे घेऊन बोलाविले. याबाबत जल्लाउद्दीन यांनी माहिती देताच मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण राठोड यांच्या पथकाने कोपरखैराणे रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला. दोन पोलीस कर्मचारी भिकाऱ्याचे वेशांतर करून पदपथावर बसले, तर वरिष्ठ अधिकारी साध्या वेशात एका रिक्षामधून परिसरात फिरत होते. त्याच वेळी पुन्हा हमीदच्या वडिलांना अपहरणकर्त्यांकडून दूरध्वनी करण्यात आला. त्यांना बालाजी थिएटर परिसरातील एका भंगार रिक्षामध्ये पैसे ठेवण्यास सांगण्यात आले. पैसे मिळाल्यावर तुमचा मुलगा दुपारी १२ पर्यंत घरी पोहोचेल, असेही सांगितले. त्यामुळे पोलिसांनीही रेल्वे स्थानक परिसरातील मुक्काम हलवून चित्रपटगृह परिसरात फिल्डिंग लावली. पोलिसांची गस्त असल्याचे लक्षात येताच पहाटे ३ वाजेपर्यंत अपहरणकर्ते तेथे आलेच नाहीत. त्यामुळे पोलीसही तेथून निघून आले. दरम्यान, पोलिसांच्या भीतीमुळे अपहरणकर्त्यांपैकी एकाने सकाळी हमीदला घराबाहेर सोडले आणि तेथून तो पळून गेला, पण उर्वरित तिघांना याचा थांगपत्ताच नव्हता. त्यामुळे हमीदच्या सुटकेसाठी ते खंडणीसाठी दूरध्वनी करत राहिले. हमीद घरी पोहोचल्याने कुटुंबीयांच्या जीव भांडय़ात पडला होता. तरीही अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. सुटका झालेल्या हमीदच्या सुटकेसाठी तुर्भे परिसरात पैसे घेऊन येतो, असे अपहरणकर्त्यांना सांगण्यात आले. त्यातील एक जण तुर्भे परिसरात खंडणीची रक्कम घेण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर पोलिसांनी उर्वरित तिघांना अटक केली.
हमीद राजा याच्या अपहरणप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी हरून इसियाक अहमद खान (१९), सुफील अहमद नन्हे खान (२०) आणि १६ व १७ वर्षीय, अशा चौघांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलामध्ये जल्लाउद्दीन यांच्या सख्ख्या पुतण्याचा समावेश आहे. जल्लाउद्दीन याने त्यांच्या वडिलांचा अपमान केला होता. त्याचा बदला घेण्याच्या उद्देशातून त्याने हा अपहरणाचा कट रचला. तसेच हरूनचे वडील उत्तर प्रदेशातील कारागृहामध्ये एका गुन्ह्य़ात बंदिस्त आहेत. त्यांच्या सुटकेसाठी त्याला पैशांची गरज होती, तर सुफीलच्या बहिणीचे लग्न होते. त्यालाही पैशांची गरज होती आणि तिसऱ्यालाही पैसे हवे होते. यातूनच हमीदचे अपहरण करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली. मुंब्रा भागातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये हे चौघेही काम करीत असून त्यांची एकमेकांशी ओळख होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अपहरणकर्त्यांच्या गफलतीने हमीद घरी परतला..
कोणताही गुन्हा करताना गुन्हेगार एखादा तरी सुगावा मागे सोडतोच, असे म्हटले जाते. नेमका हाच सुगावा धरत पोलिसांच्या तपासाची दिशा ठरत असते. मुंब्रा परिसरातील एका चार वर्षांच्या बालकाचा अपहरणाचा गुन्हा मात्र अपहरणकर्त्यांच्या गफलतीमुळेच उघडकीस आला.
First published on: 08-04-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hamid come back home due to mistake of kidnapper