केंद्रात पंतप्रधान, राज्यात मुख्यमंत्री असल्याचा युक्तिवाद करून िपपरी पालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडून खेचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसचे अजितदादांच्या झंझावाताने  पानिपत झाले. मुख्यमंत्र्यांसह दिग्गज मंत्र्यांची फौज िरगणात उतरवूनही काँग्रेसला जोरदार आपटी खावी लागली. एकीकडे राष्ट्रवादीशी लढा, आम्ही ताकद देऊ, अशी भाषणे नेते करतात व दुसरीकडे खच्चीकरणच करतात, कार्यकर्त्यांकडेच पाठ फिरवतात, त्यामुळेच अशी परिस्थिती निर्माण होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. तोंडपाटीलकी करणारे नेते, कचखाऊ स्थानिक नेतृत्व, पराकोटीची गटबाजी व नियोजनशून्य कारभारामुळे पोखरलेल्या शहर काँग्रेसचे गतवैभव मुख्यमंत्र्यांनी मिळवून द्यावे, असाही सूर पक्षवर्तुळात आहे.
पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व, तसेच आमदारांसह अन्य ताकदीचे स्थानिक नेते असल्याने िपपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद प्रचंड वाढली असून त्या तुलनेत काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. एकेकाळी िपपरी-चिंचवड म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता अस्तित्व शोधण्याची वेळ काँग्रेसवर आली  आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना शहरात लक्ष घालण्याची इच्छा नाही. अजितदादांशी थेट सामना करण्याचे धाडस काँग्रेस नेत्यांमध्ये नाही. मोठे नेते फिरकत नसल्याने  स्थानिक नेत्यांनी ‘दिवसा काँग्रेस, रात्री राष्ट्रवादी’ चा कारभार करून पक्षाचे तीन तेरा वाजवले आहेत. रामकृष्ण मोरे हयात असेपर्यंत राष्ट्रवादीशी दोन हात करण्याचे धाडस काँग्रेस कार्यकर्ते करत होते. मात्र आता तशी धमक दिसून येत नाही. अशातच, लोकसभा, विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली. मागचे विसरा व पुढच्या तयारीला लागा, असे नेत्यांचे आदेशही आले. मात्र, फाटलेले शिवण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. आघाडीचे चित्र धूसर असल्याने सत्तेतून मिळालेली सगळी ‘शस्त्रे’ असलेल्या राष्ट्रवादीशी लढायचे नियोजन आहे व आमची अवस्था काय आहे, याचा नेत्यांनाच विसर पडतो. राष्ट्रवादीने ‘बंडखोर’ आझम पानसरे नाराज होते, तेव्हा त्यांची समजूत काढण्यासाठी महामंडळ देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. मात्र, काँग्रेसकडील प्राधिकरणाचे अध्यक्षपद गेली साडेआठ वर्षे रिक्त आहे. त्यावर कार्यकर्त्यांची वर्णी लावता आलेली नाही. तेथेही राष्ट्रवादीचाच खोडा असल्याचे सांगितले जाते. सत्ता असून काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, शासकीय अधिकारी जुमानत नाहीत, कार्यकर्त्यांना पदे नाहीत, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.
काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनीच िपपरी पालिकेतील राष्ट्रवादीच्या कारभाराचा पंचनामा केला होता. पालिकेच्या मागील १० वर्षांत कमालीचा भ्रष्टाचार बोकाळला असून त्यातील काही प्रकरणे अतिशय गंभीर असल्याचे विधान त्यांनी केले होते. ठेकेदारांची तोंडे पाहून कामे काढली जातात, उधळपट्टी केली जाते. बहुमताच्या जोरावर मनमानी होते, याकडे लक्ष वेधून येथील सर्व घोटाळ्यांची चौकशी करू व दोषींवर कारवाई करण्याची घोषणा त्यांनी शहरात येऊन केली होती. मात्र, नंतर मुख्यमंत्र्यांनाच त्याचा विसर पडला. आघाडी सरकार असल्याने मुख्यमंत्र्यांवर मर्यादा असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात येत आहेत. आतापर्यंत काँग्रेस नेतृत्वाशी फटकून वागणाऱ्या राष्ट्रवादीने मनाचा मोठेपणा दाखवून, की नाईलाज म्हणून मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले, यावरून सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.  मात्र, ‘हातात हात व पायात पाय’ अशी राष्ट्रवादीची काँग्रेसच्या बाबतीत रणनीती राहिली आहे, हे उघड गुपित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा