स्थानिक अवतार मेहेरबाबा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने अंध व अपंग व्यक्तींच्या सामूहिक विवाह सोहळा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत ३ मार्चला राजीव गांधी कामगार भवनात आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी या विवाह सोहळ्यात २५ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत.
या सोहळ्यात अपंग वित्त महामंडळ, चंद्रपूर व ए.डी.आय.पी. द्वारा मिळणाऱ्या आर्थिक सहकार्यातून ९ व्हील चेअर, ११ ट्रायसिकल, ११ कॅलिपर, ९ जयपूर फुट, १२ कुबडय़ा, १७ श्रवणयंत्र इ. साहित्याचे वाटप करण्यात येणार असून १५ अपंग बांधवांना २० हजार रुपयांचे धनादेश स्वयंरोजगार करण्याकरिता देण्यात येणार आहे. आजपर्यत या संस्थेच्या वतीने फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर मध्यप्रदेश, राज्यस्थान, दिल्ली या राज्यातून अंध व अपंगांच्या ७० पेक्षा जास्त जोडप्यांचे विवाह लावण्यात यश आले आहे. मागील वर्षी २१ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले होते. या संस्थेची स्थापना २००४ ला झाली असून त्यावर्षी एका अंध मुलीचे लग्न सोमेश्वर मंदिरात लावून देण्यात आले.
या संस्थेद्वारे अंध, अपंग, मुकबधीर बांधवांसाठी शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनाकरण्यायोग्य मुला-मुलींचे विवाह जोडून त्यांच्या अडचणी दूर करण्याकरिता ही संस्था कार्यरत आहे. २००७ यावर्षी श्यामबाबु पुगलिया यांनी सामूहिक विवाह सोहळ्याकरिता लागणारा संपूर्ण खर्चाचा भार त्यांनी उचलला होता. संस्थेचे कार्यकर्ते वर्षभर अंध, अपंगांसाठी परिचय मेळाव्याचे आयोजन करतात. लग्न जोडतात आणि आवश्यक संपूर्ण औपचारिकता पूर्ण करून सामूहिक सोहळय़ात या जोडप्यांचे विवाह पार पाडले जातात. या सोहळ्यात वर- वधुंना संसारोपयोगी भांडे, साहित्य व प्रत्येक जोडप्याला १० हजार रुपये आर्थिक मदत केली जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी सर्व वधूंना सुगम संगीताच्या नादात मेहंदी व हळद लावण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. अतुल इंगोले यांच्याकडून सर्व वधुंना शालू, तर वरांना सारडांतर्फे बंगाली पैजामा भेट दिल्या जाते. सुभाष श्िंादेंतर्फे सोन्याचे मंगळसूत्र, ओमप्रकाश वर्मांतर्फे चांदीचे बिचवे व चाळ दिले जातात. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांकडून आर्थिक व वस्तू रूपाने मदत होणार आहे. या विवाह सोहळ्याला यशस्वी करण्याकरिता संजय पेचे, महेश भगत, आतिश आक्केवार, प्रकाश कोटनाके, निलिमा बळे, अमोल मारोटकर, सरिता आक्केवार, गिरीश मसराम, दीपक शिव, महेंद्र मंडले, धमेंन्द्र लुनानव आदी परिश्रम करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा