नाशिकरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयात शारदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १४ व १५ डिसेंबर रोजी अंध, अपंगांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दोनदिवसीय संमेलनात सुमारे ६० अंध व अपंग साहित्यिक आपले कलागुण दाखविणार आहेत.
शारदा बहुउद्देशीय संस्था कला, साहित्य, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक स्तरावर तीन वर्षांपासून काम करीत आहे. या संमेलनास कोणीही अध्यक्ष नाही. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. निवृत्त जिल्हाधिकारी रघुनाथ राठोड हे स्वागताध्यक्ष आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून वनाधिपती विनायकदादा पाटील, शरद मोरे हे उपस्थित राहणार आहेत. द्वितीय सत्रात दुपारी १२ वाजता ‘वेदना आणि साहित्य’ या विषयावर परिसंवाद होईल. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सटाण्याचे डॉ. सुधीर देवरे असतील. परिसंवादात पुण्याचे प्रा. डॉ. महेश देवकर, नागपूरचे डॉ. विनोद आसुदाणी, बेळगावचे रणजीत जोशी, झोडग्याचे कमलाकर देसले हे सहभाग घेतील. दुपारी तीन वाजता अंध कवींचे कवितावाचन होईल. कुडाळचे काशिनाथ महाजन अध्यक्षस्थानी राहतील. सायंकाळी साडेपाच वाजता कलादर्शन होईल. या वेळी मनश्री सोमण, अंध गिर्यारोहक नेहा पावसकर यांचा सत्कार केला जाणार आहे. बेळगावचे कलाकार चाकाच्या खुर्चीवरील कलाविष्कार सादर करतील. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता ‘अंध अपंगविषयक कायदे आणि अपेक्षा’ या विषयावर चर्चासत्र होईल. डॉ. शिरीष देशपांडे अध्यक्षस्थानी असतील.
चर्चासत्रात डॉ. संजय निशिकोटकर, राजेश आसुदाणी सहभागी होणार आहेत. दुपारी बारा वाजता डॉ. रवंींद्र नांदेडकर, मीनाक्षी देशपांडे, धनंजय भोळे, शकुंतला परांजपे या कर्तृत्ववान अंध अपंगांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन शारदा गायकवाड, किशोर पाठक, सी. पी. मिश्र, भावना विसपुते, महेंद्र गायकवाड, विजय वराडे आदींनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा