मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात आज सोमवारी कराडच्या शासकीय विश्रामगृहावर ऊसदरासंदर्भात कमराबंद चर्चा झाली. मात्र, त्यातून ऊसदराचा तिढा सुटता सुटेना अशीच वस्तुस्थिती समोर आली. शेट्टी यांच्यासोबत पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे हे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे बारामतीच्या मैदानावरील विरोधक उपस्थित होते. तर, विश्रामगृहावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य नेतेमंडळी चर्चेत सहभागी होते किंवा नाही याची माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या ‘कराड बंद’च्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने समाजातील बहुतांश घटकांचे ऊसदरवाढीला समर्थन असल्याचे मानले जात आहे.
ऊसदरासंदर्भातील बैठकीत उभय नेत्यांनी समझोत्याची भूमिका घेतली खरी, परंतु गतवर्षीपेक्षा कमी ऊसदर देणे व्यवहार्य नसल्याचा मुद्दा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी चांगलाच लावून धरला. तर, उद्या पंतप्रधानांच्या भेटीनंतर केंद्राकडून काय मदत मिळते आणि राज्य शासनाकडून अधिकाधिक सहकार्यासाठी काय करता येईल हे पाहून परवा २७ नोव्हेंबरला राज्य शासन नेमकी भूमिका स्पष्ट करेल असे राजू शेट्टी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. बैठकीत आपण कर्नाटक सरकारने चालू हंगामातील उसाची किंमत मेट्रीक टनास एकतीसशे रुपयांवर धरली आहे. तरी, राज्य सरकारने यंदा उसाची किंमत किमान तीन हजारावर मान्य करावी. या किमतीवर ८५ टक्यांऐवजी ९० टक्के उचल कारखान्यांना मिळावी. पर्चेस टॅक्स या वर्षांकरिता तरी माफ करावा या मागण्या केल्या असल्याचे नमूद करताना, किमान या तीन मागण्या तत्काळ मान्य झाल्यास ‘स्वाभिमानी’ने मागणी केलेल्या ऊसदरवाढीच्या जवळपास शेतकऱ्याला ऊसदर मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऊसदरासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसून, उद्या आपणही मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळातून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. उसाची किंमत ठरल्याखेरीज आणि पहिला हप्ता झाल्याखेरीज ऊसउत्पादकांनी कारखान्यांना ऊस घालायचाच कसा असा प्रश्न उपस्थित करून, शासनाचा ऊसदरवाढीसंदर्भात सकारात्मक निर्णय होत नाही. उसाचा पहिला हप्ता जाहीर होत नाही. तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलतील असे गृहित धरून इलेक्ट्रो मीडिया व विविध वृत्तपत्रांचे पन्नासहून अधिक प्रतिनिधी सुमारे अडीच तास विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर तिष्ठत उभे होते. यावर राजू शेट्टी यांनी बैठकीतील चर्चेची माहिती तत्काळ दिली. मात्र, पृथ्वीराज चव्हाणांच्या गाडय़ांचा ताफा सुसाट निघून गेला. यानंतर राजू शेट्टी विश्रामगृहातून मार्गस्थ होताना, ‘एकच गट्टी राजू शेट्टी’, सदाभाऊ, सदाभाऊ धुमधडाका अशा घोषणाबाजीने आंदोलक शेतकऱ्यांनी सारा परिसर दणाणून सोडला.
येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झालेल्या सरपंच परिषदेत शेतकर संघटनेचे बॅच लावून बसल्याप्रकरणी पोलिसांनी काही निमंत्रित लोकप्रतिनिधींना कार्यक्रमाच्या मंडपातून बाहेर काढले. यावर रोजगार हमी व जलसंधारण मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पोलिसांना थांबण्यास सूचवले. मात्र, पोलिसांनी या निमंत्रितांना घेराव घालून बाहेर काढले. त्यावर संतापलेल्या निमंत्रितांनी सरपंच परिषदेचे पास काढून भिरकवले. याप्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अनिल मदनाईक, शिरोळ पंचायत समितीचे सभापती कमरूद्दीन पटेल, हासूरचे सरपंच सागर पाटील, हारोलीचे सरपंच भीमराव गौडापाटील, माजगावचे सरपंच मायाप्पा जोग आदी कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक नेतेमंडळींवर कारवाई केल्याचे समजते. हा एकंदर प्रकार पोलिसांनी आकसापोटीच घडवून आणल्याची टीका ऊस उत्पादकातून होत असून, अन्यायाची भावना व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा