आपल्या प्रेमामुळे आज ओलाचिंब झालो आहे. कुठलाही राजकीय वारसा नसतानाही तुम्ही सलग तीनदा निवडून दिले ते केवळ तुमच्या प्रेमामुळे. या प्रेमाचा मी सदैव ऋणी राहीन, असे कृतज्ञतापूर्ण उद्गार खासदार हंसराज अहिर यांनी काढले. प्रसंग होता चेन्नई येथील प्राइम पॉइंट संस्थेच्या वतीने स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित सत्कार समारंभाचा. या वेळी स्वत: अहिर यांच्यासह संपूर्ण सभागृह अतिशय भावुक झाले होते.
प्राइम पॉइंट संस्थेच्या वतीने संसदेत उत्कृष्ट काम करणाऱ्या सदस्यांची निवड करण्यात येते. सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणे, खाजगी विधयके मांडणे, संसदेतील उपस्थिती, या आधारावर या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. या संस्थेच्या वतीने अहिर यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. शरदचंद्र सालफळे, शांताराम पोटदुखे, प्राइम पॉइंट संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवासन, आमदार नाना शामकुळे, महादेव डुंबेरे, लोकमान्य स्मारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सच्चिनानंद मुनगंटीवार, चंदेनसिंह चंदेल, माजी आमदार अशोक नेते, रमेशचंद्र बागला, जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे आदी उपस्थित होते.
माझ्या या प्रवासात अनेकांनी सहकार्य केले. मला जबाबदारीची जाणीव सदैव होती. माझ्या मतदारसंघात अनेक समस्या आहेत. त्यातील पूर्ण सोडवणे शक्य नसले तरी त्यातील काही समस्या आपण सोडवू शकतो, ही जाणीव मात्र होती. भूगर्भात न संपणारी मोल्यवान संपत्ती दडलेली आहे, मात्र ती फुकटात मोजक्याच लोकांना देण्यात आली. आपला देश गरीब नाही, पण अशा पद्धतीने संपत्तीचे केंद्रीकरण झाले आहे. गेल्या आठ वर्षांपासून कोळसा प्रश्नावर बोलत होतो. जेव्हा कॅगचा अहवाल आला तेव्हा आनंद झाला, असेही ते म्हणाले. आपला मुलगा पराक्रमी आहे, हे आईला किंवा घरच्यांना इतरांकडून माहिती होते.
जेव्हा जग त्याचे कौतुक करायला लागते तेव्हाच वास्तविकता घरच्यांना कळते. एका लहान शहरातल्या माणसाच्या कर्तृत्वाची जाणीव आम्हाला चेन्नईत झाली आणि त्याची आम्ही दखल घेतली. राजकारण वाईट आहे, असे बोलतो, पण खऱ्या अर्थाने चांगल्या लोकांनी राजकारणात येण्याची गरज आहे, असे मत प्राइम पॉइंट संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी व्यक्त केले. राजकारण्यांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेला स्वधर्म, चाणक्यांनी आपला शिष्याला सांगितलेला लोकमानस म्हणजे ज्यांचे नेतृत्व केले आहे त्यांच्या इच्छा, समाजशास्त्र, अर्थशास्त्र यांचा अभ्यास, शिवाजी महाराजांनी सांगितलेले स्वराज्य या गोष्टीचा आदर्श ठेवला पाहिजे. लोकशाही ही लोकहिताचा विचार करणारीच असली पाहिजे, या बाबी लोकप्रतिनिधींनी नेहमीच ध्यानात ठेवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात पंडित अग्निहोत्री यांनी केले. भारत ही सर्वात मोठी लोकशाही असून सामान्य माणसाच्या हातात मतदानाचा अधिकार असतो. लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक असतात, असे मत डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी मांडले. चंद्रपूर शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या दिवंगत दादाजी येरावार, यशवंत कुलकर्णी, भंवरलाल भंवरा यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा