अडीच हजारावर लाभार्थीना फायदा
येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात मनोहरभाई पटेल अकादमी आणि कानपूर येथील कृत्रिम अवयव निर्माण निगम (एल्मिको) भंडारा जिल्ह्य़ातील एक दोन नाही, तर तब्बल २७०५ लाभार्थीना आवश्यकतेनुसार ट्रायसिकल, व्हीलचेअर, क्लीपर, कृत्रिम पाय, कृत्रिम हात, अंधांसाठी ब्रेलपाटय़ा, कर्णयंत्र, फोल्डिंग चेअर याबरोबर अन्य अनेक उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षां पटेल होत्या.  
कार्यक्रमाचे संयोजक, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफु ल्ल पटेल म्हणाले, आपल्या अपंगत्वाची खंत प्रत्येकाच्या मनात सलत असते. त्यांना आवश्यक साहित्य मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान, कृतज्ञतेचा भाव, अंतर्मनातून उमटलेला आनंद खासदार किंवा मंत्री होण्याच्या आनंदापेक्षा निश्चितच खूप मोठा असेल. मनोहरभाई पटेल यांचे सेवाव्रत अखंड समोर नेत आहोत. हजारो लाखो रुग्णांना शिबिरांच्या माध्यमातून सेवा प्रदान केली जात आहेत. अपंगांना दिलेले साहित्य दर तीन वर्षांनी बदलून दिले जाईल, तसेच वंचित राहिलेल्यांसाठी आणखी एका शिबिराचे आयोजन केले जाईल. या सेवा कार्यासोबतच भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्य़ांकरिता अधिकाधिक लाभाच्या योजना आम्ही खेचून आणल्या आहेत. सिंचन, पर्यटन, मागास भागांचा विकास, उद्योग अशा अनेक योजनांतून भरपूर निधी दोन्ही जिल्ह्य़ांना उपलब्ध झाला आहे आणि होणार आहे. जवाहरनगर आयुध निर्माणीतील भरतीत, स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळावे, याकरिता सतत पाठपुरावा करीत आहोत. भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्य़ातील मेगा टुरिझम सर्किटसाठी ५० कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली.
एल्मिको कानपूरचे प्रबंधक कर्नल पवनकुमार दुबे यांनी बोलताना अशाप्रकारचा सेवाभावाच्या दृष्टीने अभूतपूर्व कार्यक्रम यापूर्वी भारतात कोठेही झाला नसल्याचे सांगितले. त्यांच्या कंपनीत अपंगांना उपयोगी १५३ प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन होत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ़प्रास्ताविक आमदार राजेंद्र जैन यांनी केले. माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, माजी राज्य शिक्षणमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, आमदार अनिल बावनकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. संचालन राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष धनंजय दलाल यांनी केले. याप्रसंगी मंचावर एल्मिकोचे वरिष्ठ प्रबंधक संजय सिंह, आर. के. माथूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. डोईफोडे, आनंदराव वंजारी, जिया पटेल, अविनाश ब्राह्मणकर, नरेश डहारे, नगराध्यक्ष वर्षां धुर्वे, प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, प्राचार्य डॉ. जुल्फी शेख, प्राचार्य संगीता लोधी-रोकडे  आदी मान्यवर  उपस्थित होते. या शिबिरात पाच वर्षांच्या अपंग बालकांपासून सत्तर वर्षांच्या वृद्धांपर्यंतचे अपंग स्त्री-पुरुषांना लाभ मि़ळाला. पायाने विकलांग, तसेच उभे राहू न शकणाऱ्यांना येथील ज.मु. पटेल महाविद्यालय, दिवं. रेवाबेन मनोहरभाई पटेल महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेशद्वारापासून व्यासपीठावर आणले.

Story img Loader