भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा देण्याची घोषणा संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुल्का यांनी राज्यसभेत करताच शहरासह मराठवाडय़ात सर्वत्र एकच जल्लोष करण्यात आला. आंबेडकर अनुयायांसह समर्थक कार्यकर्ते व जनतेने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे व संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरेल असे व्हावे, अशी अपेक्षाही या निमित्ताने मान्यवरांनी व्यक्त केली.
मिलिंद कला महाविद्यालयात फटाके वाजून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांनी राज्य व केंद्र सरकारचे आभार मानून आंबेडकरी जनतेचा हा विजय असल्याची भावना व्यक्त केली. डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. हिंगोले, विभागाचे उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकूल, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या प्रा. लीला सांगोळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

निर्णय ताकद देणारा – जनपरिषद
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेचा प्रश्न निकाली काढणे, म्हणजे जातीय व धर्माध शक्तींचा नायनाट करणाऱ्या लढय़ास एक प्रकारे ताकद देणेच आहे, अशी प्रतिक्रिया समाजवादी जनपरिषदेचे प्रदेशाध्यक्ष व नामांतर लढय़ातील अग्रणी साथी सुभाष लोमटे यांनी व्यक्त  केली. डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत लोकशाही समाजवादी व्यवस्था समाजतील सर्व उपेक्षित कष्टक ऱ्यांना न्याय देऊ शकेल. सर्व जनआंदोलनांना या निर्णयामुळे शक्ती मिळेल, असा विश्वास पत्रकात व्यक्त केला. समाजवादी जनपरिषद, राज्य हामाल-मापाडी महामंडळ, मोलकरणी व घरेलू कामगार संघटनांचे कार्यकर्त्यांनीही आनंद व्यक्त केला.

राष्ट्रीय दलित पँथरच्या वतीने स्वागत
राष्ट्रीय दलित पँथरचे मराठवाडा अध्यक्ष आनंद कस्तुरे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. आंबेडकर यांच्या भडकल गेट येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, मिठाईवाटप व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला. राष्ट्रीय दलित पँथरचे संस्थापक नानासाहेब भालेराव यांनी इंदू मिलचा प्रश्न निकाली निघाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष रतन जाधव, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राहुल वडमारे, युवक शहर अध्यक्ष गणेश रंधवे, तालुको अध्यक्ष संजय निमोने आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आरपीआय
(डेमोक्रॅटिक)कडून स्वागत
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने इंदू मिलचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगून निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाचे नेते रमेश गायकवाड आदींनी स्वागत केले.

पँथर्स रिपब्लिकनतर्फे आतषबाजी
पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने क्रांती चौक येथे माजी उपमहापौर प्रकाशभाऊ निकाळजे, मराठवाडा कार्याध्यक्ष श्रावण गायकवाड, जिल्हाध्यक्ष राजू साबळे, बंडू कांबळे, शहराध्यक्ष अनिल मगरे यांच्या नेतृत्वाखाली ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहागंजला गांधी भवनात मिठाई वाटून आतषबाजी झाली. शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सय्यद अक्रम, माजी खासदार उत्तमसिंह पवार, राजकुमार जाधव, डॉ. पवन डोंगरे आदी उपस्थित होते.

भारिप-महासंघातर्फे सभा
भारिप-बहुजन महासंघातर्फे निर्णयाचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेस महाराष्ट्र प्रदेश महासचिव अ‍ॅड. रमेश खंडागळे, रामभाऊ पेरकर, मंगेश निकम, मनीषा भुईगळ, सोनी गायकवाड आदी उपस्थित होते.

बीडमध्ये जल्लोष
 बीड/वार्ताहर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास इंदू मिलची जागा हस्तांतरित करण्याच्या निर्णयाचे जिल्ह्य़ातील आंबेडकरवादी जनतेने स्वागत करून, फटाके वाजवून जल्लोषात स्वागत केले. या जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याची प्रक्रिया गतिमान करावी, अशी मागणी करतानाच सरकारच्या निर्णयाचे आंबेडकरवादी जनतेतून स्वागत करण्यात येत असल्याचे मत रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी व्यक्त केले.

सरकारचे अभिनंदन – कांबळे
 लातूर/वार्ताहर
इंदू मिलचा प्रश्न नामांतरासारखा चिघळू न देता तो तातडीने सोडवल्याबद्दल मुख्यमंत्री व केंद्र सरकार यांचे अभिनंदन केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया आरपीआय डेमॉक्रेटिक गटाचे अखिल भारतीय अध्यक्ष टी. एम. कांबळे यांनी व्यक्त केली. इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी देण्याचा निर्णय संसदेत घेण्यात आला. हा देशातील कोटय़वधी आंबेडकरी विचारांच्या अनुयायांचा विजय आहे. याप्रश्नी श्रेय लाटण्यासाठी जी धडपड तथाकथित नेतेमंडळी करत आहेत, ती अतिशय चुकीचे असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

मान्यवर म्हणतात..
कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे – अत्यंत चांगला व योग्य निर्णय. बाबासाहेबांचे नाव असलेल्या विद्यापीठाच्या दृष्टीने तर निश्चितच आनंदाची व अभिमानाची बाब आहे. स्मारकात आवश्यक ठरणाऱ्या सर्व गोष्टींबरोबरच जगातले सवरेत्कृष्ट ठरणारे ग्रंथालयही व्हावे. बाबासाहेबांचे ग्रंथांवर खूप प्रेम होते. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त झालेल्या या निर्णयाचे स्वागत करतानाच सर्वानी त्यांचे विचार नि शिकवण स्वीकारून शब्दार्थाने व लक्षार्थाने प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा संकल्प सोडावा. तीच या महामानवाला खऱ्या अर्थाने आदरांजली ठरावी.

ज्येष्ठ विचारवंत अविनाश डोळस – गेली अनेक वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाले असून हा ऐतिहासिक निर्णय आहे. मुख्यमंत्र्यांनी या बाबत समजूतदारपणा दाखवत दिल्लीदरबारी त्यांचे वजन वापरले. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह सर्वाचेच अभिनंदन.

दत्ता भगत – आनंद वाटावा असाच हा निर्णय आहे. मात्र, या साठी मागणी करावी लागते हेच मुळात दुर्दैवी आहे. सरकारने यापुढे स्वत:च पुढाकार घेत राष्ट्रीय प्रतिमा असलेल्या नेत्यांच्या स्मारकाविषयी लवकर योग्य निर्णय घ्यावा.

प्रा. ऋषीकेश कांबळे – स्वागतार्ह निर्णय. सर्व जगाने मान्यतेची मोहोर उमटविलेले नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. कोलंबिया विद्यापीठाने जगावर प्रभाव टाकलेल्या आपल्या १०० विद्यार्थ्यांची यादी तयार केली. त्यात पहिले नाव डॉ. आंबेडकरांचे होते, याचा अर्थ बाबासाहेबांची सामाजिक न्यायाची भूमिका व वंचितांना मुक्तीबाबतचा विचार सर्व जगाने मान्य केला. त्यामुळे स्मारकाबाबतचा निर्णय म्हणजे सरकारने व देशाने बाबासाहेबांना दिलेली ही मानवंदनाच होय. हे स्मारक आंतरराष्ट्रीय व्हावे, तसेच त्यात बाबासाहेबांविषयी जगभरातील मान्यवरांनी केलेल्या भाष्यग्रंथाचे दालन व्हावे.

प्राचार्य एम. ए. वाहूल – आंबेडकरी विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वाचाच हा विजय आहे. स्मारकाचे श्रेय कोणाचे यापेक्षा सर्वाच्या सहमतीने, प्रयत्नांनी मिळालेले हे यश आहे. स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे.