देशात पडलेली कडाक्याची थंडी कोकणातील हापूस अंब्याच्या उत्पादनात पथ्यावर पडली असून या वर्षी गतवर्षीपेक्षा हापूस आंब्याची आवक दुप्पट वाढणार असल्याचे दिसून येते आहे. गेल्या वर्षी १० मेनंतर आलेला हापूस या वर्षी चक्क जानेवारी महिन्यात बाजारात आला असून सोमवारी देवगडमधील ८० पेटय़ा एपीएमसीच्या फळबाजारात डेरेदाखल झाल्या आहेत. मात्र खत, औषधे, वाहतूक, कामगार यांच्या किमतीत झालेली वाढ हापूस आंब्याची किंमत वाढण्यासाठी कारणीभूत ठरणार असल्याचे दिसून येते.
कोकणातील हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे. त्यात देवगडच्या हापूस आंब्याला तर मागणी अधिक आहे. हापूस आंब्याची फळधारणा नोव्हेंबर माहिन्यात सर्वसाधारणपणे सुरू होते. या वर्षी याच काळात पडलेली गुलाबी थंडी आणि अलीकडे पडणारी कडाक्याची थंडी यामुळे हापूस आंब्याचा मोहोर चांगलाच वधारला आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा या वर्षी हापूस आंब्याचे उत्पादन जास्त येणार हे आता नक्की झाले आहे. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे अमाप आलेल्या मोहोरवर रोगराई पसरली आणि हापूस आंब्याचे उत्पादन नंतर घटले होते. तशी नैसर्गिक स्थिती निर्माण न झाल्यास या वर्षी हापूस अांब्याचे उत्पादन दुप्पट होईल असा अंदाज एपीएमसीच्या फळबाजाराचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केला. गतवर्षी सव्वा लाख पेटय़ा हापूस आंब्याच्या बाजारात आल्या होत्या. त्या वेळी आंबा बागायतदारांना हापूस आंबा झाडावरून उतरविण्यास व बाजारात पाठविण्यासही कमी कालावधी मिळाला होता. गतवर्षी १० मेनंतर हापूस आंबा बाजारात आला होता. या वर्षी मात्र त्याने चार महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात पाऊल ठेवले आहे. सोमवारी बाजारात आलेल्या देवगड येथील हापूस आंब्याचे जोरदार स्वागत झाले. हापूस आंब्याची ही पाच डझनांची एक पेटी चार ते पाच हजार रुपयांची आहे. तो आंबा सध्या रायपलिंग चेंबरमध्ये पिकण्यासाठी गेला असून पुढील १५ दिवसांत पिकल्यानंतर बाजारात येणार आहे मात्र मागील काही वर्षी हापूस आंब्याचा गुढीपाडव्याचा मुहूर्त अलीकडे येऊ लागला आहे. पूर्वी हाच हापूस विधिवत पूजा करून गुढीपाडव्याला बाजारात येत होता.
हापूस आंब्याच्या झाडांना आलेला चांगला मोहोर आणि त्यामुळे येणाऱ्या भरघोस उत्पादनाची आशा असताना मात्र एक सर्वसामान्यांना नाराज करणारी बातमी आहे. महागाईच्या या जमान्यात या वर्षी हापूस आंबाही मागे राहणार नाही असे दिसून येते. खत, औषधे यांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. आंबा बागेत काम करायला कामगार मिळत नाहीत. जे मिळत आहेत त्यांची मजुरी जास्त आहे. त्यामुळे कामगारांची मजुरी वाढली आहे. यात नेपाळमधून आलेल्या गुरख्यांचा समावेश जास्त आहे. बायको-पोरासह आलेले हे नेपाळी तरुण मे महिन्यानंतर गावी परत जात असल्याचे दिसून येते. या तीन वाढत्या किमतीबरोबरच डिझेलमध्ये वाढ झाल्याने वाहतूकदारांनी किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे कोकणातून हापूस आंबा आणताना पूर्वीपेक्षा अधिक किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे एकूण उत्पादन खर्च वाढल्याने या वर्षी हापूस आंब्याची किंमत वाढणार हे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांची ही समस्या एकीकडे असतानाच व्यापाऱ्यांनाही सरकारने कचाटय़ात पकडले आहे. त्यामुळे ते नाराज आहेत. या वर्षांपासून कमिनशनची टक्केवारी तीन टक्क्यांनी कमी केल्याने व्यापारी हबकला आहे. कमिशन कमी करण्याचे आदेश देण्यापूर्वी व्यापाऱ्यांनी कोकणातील बागायतदारांवर करोडो रुपये दिले आहेत. त्यात शेतमाल रोखीने विकण्याचे आदेश एपीएमसीने जारी केले आहेत. त्यामुळे रोखीने माल खरेदी केल्यास तो कमी खरेदी केला जाणार आहे. उधार विकल्यामुळे पैसे मिळण्याची हमी कमी होणार आहे. सरकारने मात्र व्यापाऱ्यांना लुटारू ठरवून महम्मद तुघलकी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्हाला सध्या कोणी वाली नसल्याची खंत पानसरे यांनी व्यक्त केली.

Story img Loader