राज्यात उन्हाचा वाढलेला पारा कोकणातील हापूस आंब्याच्या पथ्यावर पडला असून आंबा तयार होण्याची प्रक्रिया झपाटय़ाने होऊ लागली आहे. त्यामुळे बागायतदारांनी तयार आंबे झाडावरून काढून मुंबईत पाठविण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या तीन दिवसांत पाच लाख पेटय़ा इतका रेकॉर्डब्रेक हापूस आंबा नवी मुंबईतील एपीएमसीच्या फळ बाजारात येऊन पडला असून या आंब्याला उठाव नसल्याने येत्या तीन-चार दिवसांत हापूस आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. कोकणच्या या वाहत्या गंगेत कर्नाटकचे हापूस बागायतदार आपले हात धुवून घेत असून देवगडचा हापूस म्हणून बाजारात विकत आहेत.
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्य़ांत या वर्षी हापूस आंब्याचे विक्रमी उत्पादन आले आहे, पण अवेळी पडलेला पाऊस, कडाक्याची थंडी यामुळे पहिली फळधारणा गळून पडली. त्यामुळे दुसऱ्या फळधारणेचे रूपांतर तुलनेने छोटय़ा फळात झालेले आहे. त्यामुळे या वेळच्या हापूसचे उत्पादन जास्त असले तरी आंबे छोटे आहेत.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या गारपिटीमुळे कोकणात मध्यंतरी थंडीची लाट पसरली होती. ती हापूस आंब्याला मारक ठरली. त्यामुळे चिंताग्रस्त असलेला आंबा बागायतदार कडाक्याची उन्हं पडू लागताच आंबा उतरवून मुंबईत पाठवू लागला आहे.
शुक्रवारी दोन लाख हापूस आंब्याच्या पेटय़ा बाजारात आल्याची नोंद आहे, तर शनिवारी हीच संख्या दीड लाखांच्या घरात गेली. रविवारी घाऊक बाजार बंद असल्याने सोमवारी सकाळी पुन्हा दीड लाख हापूस आंब्याच्या पेटय़ा बाजारात येऊन धडकल्या आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत पाच लाख हापूस आंब्याच्या पेटय़ा बाजारात दाखल झाल्या असून याला ग्राहक नसल्याने व्यापारी डोक्याला हात लावून बसला आहे.
येत्या दोन-तीन दिवसांत या मालाला ग्राहक मिळाले नाहीत तर हापूस पिकण्याची प्रक्रिया वेगाने होत असल्याने तो स्वस्तात विकण्याशिवाय व्यापाऱ्यांसमोर दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही. त्यामुळे हापूस आंब्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या खवय्यांनी अजून दोन दिवस कळ काढण्याची गरज असून महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर फळांच्या राजाचा भाव शंभर रुपये प्रतिडझन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (सध्या तीनशे ते सहाशे रुपये डझन दराने हापूस आंबा उपलब्ध आहे.) या वर्षी कोकणातून येणारा बहुतेक आंब्याचा आकार लहान असल्याने प्रतिडझन शंभर-दोनशे रुपयांत मिळणारा आंबाही लहानच असणार आहे.
हापूस आंब्याची आवक अचानक वाढल्याने येत्या पंधरा दिवसांत कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम संपण्याची शक्यता फळबाजार संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली. निर्सगाच्या दृष्टचक्रात अडकलेल्या हापूस आंबा बागायतदाराला अलीकडे एका नवीन संकटाचा सामना करावा लागत असून कर्नाटकचा हापूस आंबा देवगडचा हापूस म्हणून बाजारात काही किरकोळ व्यापारी विकत आहेत.
हा व्यापार करणाऱ्यांमध्ये उत्तर भारतीय व पश्चिम बंगालचे किरकोळ विक्रेते मोठय़ा प्रमाणात आहेत. कोकणातील हापूस आंब्याच्या देठाचा वास घेतल्यानंतर एक घमघमाट नाकात शिरतो, हाच कोकणातील हापूस ओळखण्याची खूण असल्याचे व्यापारी सांगतात.
फळांच्या राजालाही वाहतूक कोंडीचा ताप
हापूस आंब्याच्या या आक्रमणामुळे एपीएमसीच्या फळबाजाराचे पुरते तीनतेरा वाजले आहेत. हजारो गाडय़ांनी बाजाराला चारी बाजूंनी वेढल्याने दुसऱ्या बाजारांचा व्यापार ठप्प झाला आहे. सकाळपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी रात्री उशिरापर्यंत सुरळीत होण्याचे नाव घेत नसून बाजाराच्या आजूबाजूला याच वेळी पालिकेनेही नागरी कामे काढलेली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडली आहे. या सर्व दुरवस्थेकडे व्यापाऱ्याकडून कर घेणारी बाजार समिती मात्र ढिम्मपणे पाहत असून ठोस उपाययोजनांचा पत्ता राहिलेला नाही. त्यामुळे कोकणातून आलेला हापूस अतिउष्णतेमुळे गाडय़ांमध्येच पिकत असून बागायतदाराच्या यातनांना अंत राहिलेला नाही.

Story img Loader