तरुणींना मानसिक त्रास देण्याची एक जुनी पद्धत पुन्हा वापरण्यास सुरुवात झाली आहे. सार्वजनिक शौचालयात तरुणींचे मोबाईल क्रमांक लिहून ठेवायचे आणि त्याखाली ‘कॉल गर्ल’ साठी संपर्क करा असा उल्लेख करायचा, अशी ही पद्धत आहे. मुंबईतील अनेक सार्वजनिक शौचालयात अशा प्रकारे तरुणींचे मोबाईल क्रमांक लिहून ठेवण्यात आलेले आहेत. अनेक आंबटशौकिन या क्रमांकांवर वेळीअवेळी फोन करून या तरुणींना त्रास देत आहेत. शिवसेनेच्या एका नगरसेविकेच्या बाबतीत असाच प्रकार मध्यंतरी घडला होता.
अंधेरीत राहणाऱ्या सोनम गुप्ता (नाव बदललेले) या तरुणीला गेल्या काही दिवसांपासून तिच्या मोबाईलवर फोन येत होते. ‘आज रात्रीचा दर काय’, अशी विचारणा तिला केली जायची. सोबत अश्लील भाषा वापरली जायची. सोनमने सुरुवातीला दुर्लक्ष केले. नंतर हा प्रकार वाढत गेला. फोन करणाऱ्या एका व्यक्तीला जाब विचारल्यावर एका सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर हा नंबर लिहिलेला होता, अशी माहिती त्याने दिली. सोनमने आपली ही व्यथा ‘लोकसत्ता’कडे मांडली. परंतु पोलीस व्यापात पडायचे नसल्याने आणि बदनामीपोटी तिने पोलिसामंध्ये तक्रार केली नाही. मी आता मोबाईल क्रमांक बदलण्याच्या विचारात आहे, असे सोनम म्हणाली. माझ्याच कुणातरी परिचिताने हे केले असावे अशी शक्यताही तिने व्यक्त केली. हा प्रकार सोनमसारख्या अनेक तरुणींच्या बाबतीत घडत आहे. अनेक सार्वजनिक शौचालयांमध्ये अशाप्रकारे तरुणींचे मोबाईल क्रमांक लिहून ठेवल्याचे आढळले आहे.
 राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. या संदर्भात त्या पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचीही भेट घेणार आहेत. ज्या मुलींना अशा प्रकारे त्रास दिला जात असेल त्यांनी त्वरीत पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. मुंबई पोलिसांचे प्रवक्ते पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील यांनी अशा प्रकारे फोन करणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते, असे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे लिहिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करणे हाच गुन्हा आहे, असे ते म्हणाले. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने ज्या ज्या ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयात अशाप्रकारे मोबाईल क्रमांक लिहिलेले असतील ते त्वरीत पुसून टाकावे, तेथे रंगरंगोटी करायला हव्यात असेही पाटील म्हणाले.

Story img Loader