वाढत्या गर्दीच्या तुलनेत उपनगरी रेल्वे गाडय़ा अपुऱ्या असल्याने मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास आधीच अतिशय जिकिरीचा ठरत असताना सध्या या मार्गावर धावणाऱ्या जुन्या गाडय़ांमुळे त्यांच्या हालात भर पडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या कर्जत मार्गावर धावणाऱ्या एका गाडीच्या काही डब्यांना तीनऐवजी दोनच दरवाजे आहेत. त्यामुळे गाडीत चढता-उतरताना प्रवाशांना बरीच कसरत करावी लागते. गाडीत जागा असूनही दरवाज्यातील गर्दीमुळे फलाटावरील प्रवाशांना आतमध्ये शिरता येत नाही. तसेच आतील प्रवाशांनाही उतरताना त्रास होत आहे.
नवी मुंबईसाठी उपनगरी सेवा सुरू झाल्यानंतर ठाणे स्थानक आणि पर्यायाने मध्य रेल्वेवरील कर्जत/कसारा मार्गावरील प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. मात्र त्या तुलनेत उपनगरी गाडय़ा वाढल्या नाहीत. मुंबईत उपनगरी रेल्वेला बेस्ट, मोनो आणि मेट्रो असे पर्याय उपलब्ध आहेत. ठाणे पल्याडच्या प्रवाशांना सध्या तरी तसा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. नजीकच्या काळात तसा कोणताही पर्याय उपलब्ध होण्याची चिन्हेही दिसत नाहीत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना उपनगरी गाडय़ांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबई-ठाण्यात घरांच्या किमती आवाक्यात नसल्याने मध्यमवर्गीय नोकरदार मोठय़ा प्रमाणात कल्याण पल्याड टिटवाळा-बदलापूर पट्टय़ात स्थलांतरित होऊ लागला आहे. अंबरनाथ, बदलापूर, वासिंद परिसरातील औद्योगिक परिसरातील कंपन्यांमध्ये नोकरीनिमित्त येणाऱ्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांची संख्याही वाढली. अंबरनाथला तर व्होल्व्हो, महिंद्रा, गोदरेज आदी मोठय़ा कंपन्या आल्या आहेत.
बदलापूर, कर्जत, आसनगाव परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये या मार्गावरील विद्यार्थी प्रवाशांचीही संख्या वाढली. पूर्वी सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबईहून येणाऱ्या गाडय़ांना गर्दी असायची. आता असा विशिष्ट पीकअवर राहिला नसून दिवसातल्या कोणत्याही वेळी गाडय़ांना गर्दी असते.
ठाण्याहून कर्जत/कसारा मार्गावर नियमित शटल सेवा सुरू करणे हाच यावर उपाय आहे. यासंदर्भात प्रवासी संघटनांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर चार वर्षांपूर्वी ठाण्याहून कर्जत/कसाऱ्यासाठी शटल स्वरूपाच्या ३४ फेऱ्या सुरू करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने अर्थसंकल्प सादर करते वेळी केली होती. मात्र प्रत्यक्षात त्यातील निम्म्या फेऱ्याही रेल्वे प्रशासन अद्याप प्रत्यक्षात सुरू करू शकलेली नाही. गर्दीचे लोंढे मात्र दिवसेंदिवस वाढतच आहेत. वाढीव फेऱ्या देण्यास असमर्थ ठरलेल्या रेल्वे प्रशासनाने किमान नव्या चांगल्या क्षमतेच्या गाडय़ा या मार्गासाठी द्याव्यात. जुन्या, अपुऱ्या दरवाज्यांच्या गाडय़ा देऊन सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी प्रवाशांची भावना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा