खेळाडूंसाठी शिस्त सर्वात महत्त्वाची आहे. जे उपलब्ध असेल ते खावून आधी तंदुरुस्त व्हा, नंतर खेळा.. असा सल्ला प्रख्यात मुजुमदार क्रिकेट अकादमीचे संस्थापक संचालक व प्रशिक्षक सुनील मुजुमदार यांनी सर्वच खेळाडूंना दिला आहे. सुनील मुजुमदार यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला मंगळवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी झालेल्या छोटेखानी सत्कार कार्यक्रमात मुजुमदार म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून मी क्रीडा क्षेत्रात काम करीत आहे, पण मला खूप उच्च श्रेणीचे क्रिकेट खेळता आले नाही. परंतु, उत्कृष्ट क्रिकेटपटू तयार करण्यासाठी क्रिकेट अकादमी स्थापन केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ज्युनि. प्रीतम गंधे यांच्यासारखे क्रिकेटपटू या अकादमीत तयार झाले आहेत. ग्रॅहम गूच, चंदू बोर्डे, राजेश चव्हाण, संजय जगदळे यांच्यासारख्या नामांकित खेळाडूंनी अकादमीत प्रशिक्षण दिले आहे, याचा त्यांनी यावेळी उल्लेख केला.
शिवाजी शिक्षण संस्थेच्या धनवटे नॅशनल कॉलेजने मैदान उपलब्ध करून दिले आणि मी प्रयत्न केल्याने ही यशस्वी वाटचाल शक्य झाली आहे. मैदानाच्या बाजूला असलेल्या अंध विद्यालयातील मुलांसाठी काही करतो, याचे समाधान आहे, असेही मुजुमदार यांनी सांगितले. सुनील मुजुमदार यांनी गेल्या तीन दशकांपासून क्रिकेट प्रशिक्षक म्हणून वाहून घेतले आहे.
एक कठोर शिस्तप्रिय प्रशिक्षण म्हणून त्यांनी नाव कमावलेले असून त्यांच्या क्लबच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केली आहे. व्हीसीएचे पदाधिकारी, भारतीय क्रिकेट संघाचे स्थानिक व्यवस्थापक म्हणूनही मुजुमदार यांनी काम पाहिलेले आहे.
याप्रसंगी ‘लोकसत्ता’ क्रिकेट संघाचे कर्णधार हर्ष दातीर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मुजुमदार यांचा सत्कार करण्यात आला. सहसंपादक चंद्रकांत ढाकुलकर यांच्या हस्ते त्यांना भेटवस्तू देण्यात आली. यावेळी वरिष्ठ मुख्य वितरण व्यवस्थापक वीरेंद्र रानडे उपस्थित होते.

Story img Loader