भारतीय प्रशासकीय सेवेच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम व चिकाटी यांस पर्याय नाही. त्यामुळे कोचिंग क्लासेसच्या आमिषांना व फसव्या जाहिरातींना भुलू नका, असा सल्ला सहकार आयुक्त भरत आंधळे यांनी दिला. समाजाच्या उद्धारासाठी भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षा द्याव्यात व त्यामध्ये यशस्वी होऊन स्वत:ला समाजासमोर सिद्ध करावे. उच्च पदाधिकारी होत असताना समाजाशी असणारी आपली नाळ कायम ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
शहरातील यशवंतराव महाराज पटांगणात आयोजित नाशिक वसंत व्याख्यानमालेत ‘स्पर्धा परीक्षा आणि युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर आंधळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आंधळे यांनी आपल्या यशाची थोडक्यात मांडणी केली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शैक्षणिक प्रवास कायमच खडतर राहिला. आयुष्यात पहिल्यांदाच आठवीमध्ये सर्व विषयात उत्तीर्ण झालो. दहावीत ५४ टक्के गुण मिळाले. बारावीची परीक्षा बाहेरून दिली. पुढे पदवीधर झालो, तर घरी पदवी म्हणजे काय हेच माहिती नाही. मित्रांच्या सांगण्यावरून लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. सधन कुटुंबातील मुलेच आयएएस होतात हा समज सर्वसामान्य कुटुंबांतील मुलांनी कायमचा काढून टाकावा. कठोर परिश्रम व आत्मविश्वाच्या बळावर स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होता येते. मी स्वत: सहा वेळा आयएएसची परीक्षा दिली आहे. जीवनात अपयश हे प्रत्येकाच्या वाटय़ाला येत असते. त्यामुळे खचून न जाता जिद्दीने आपल्यातील कमतरता दूर करीत यशाची पायरी चढावी, असे आवाहन आंधळे यांनी केले.
लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि फौजदार झालो. पण बरोबरचा मित्र यूपीएससी उत्तीर्ण झाला. त्याचे वृत्तपत्रात छायाचित्र प्रसिद्ध झाले. तेव्हा यापुढे यूपीएससीची परीक्षा देण्याचा निश्चय केला. मनात ध्येय होते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी व्हायचे. आज ध्येय पूर्ण झाल्यासारखे वाटते. स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत विविध पदांवर काम करीत असताना समाजाशी असणारी बांधीलकी कायम ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला. यशाची पहिली पायरी चढताना आनंद झाला. ध्येय ठेवले तर यश नक्की मिळते, असेही त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक श्रीकांत बेणी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा