डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची अनम खान हिने विज्ञान शाखेत ९७ टक्के गुण मिळवून मुलींमध्ये बाजी मारली तर शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा जयेश गोपाळ बनसोले याने ९६.३३ टक्के गुण मिळवून नागपुरातून द्वितीय येण्याचा मान मिळवला. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या अस्मिता गेडेकर ९६.१६ टक्के गुण मिळवून नागपुरातून तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली. अनम म्हणजे दैवी देणगी. अनमने बारावी विज्ञान शाखेत संपादित केलेले यश म्हणजे अनमला देवाची देणगीच मिळाल्याची प्रतिक्रिया तिच्या पालकांनी व्यक्त केली. खाजगी शिकवणी झाल्यावर ती रोज १० तास अभ्यास करायची. अनमला वैद्यकीय सेवेत नाव कमवायचे आहे. तिला सर्जन व्हायचे आहे. वाचन तिला आवडते. एपीजे अब्दुल कलाम तिचे आदर्श आहेत. प्रॉव्हिडन्स गर्ल्स स्कुलमधून तिने दहावी उत्तीर्ण केली. तेव्हा ९५ टक्के गुण मिळवून ती शाळेतून दुसरी आली होती. अनमची आई शाहीन परवीन अंजूमन कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्र विषयाची शिक्षक आहे तर वडील नासिर अंजूमन तंत्रनिकेतनमध्ये शिक्षक आहेत. अनमच्या एकूण व्यक्तीमत्त्वाविषयी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनीती रेड्डी भरभरून बोलल्या. विषयाला अतिशय गांभीर्याने हाताळणारी अनमच्या यशाचे त्यांनी भरभरून कौतुक केले.
जयेश बनसोले
जयेशचे वडील रेल्वे खात्यात अधिकारी असून आई हेमा बनसोले गृहिणी आहेत. जयेशला अभियंता होण्याची जबर इच्छा असून बारावीत महाविद्यालयातून प्रथम येईल, असे त्याला अजिबातच वाटले नव्हते. ठरावीक अभ्यास केला. कोणत्याही विषयाचे फार टेंशन घेतले नाही. दोन पेपर एकत्र आल्याने अभ्यास करणे सोपे गेले. भौतिकशास्त्राच्या पेपरनंतर तो फारच कठीण असल्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. मात्र पदार्थविज्ञानचा पेपर अतिशय सोपा गेल्याचे जयेशने सांगितले. त्याला त्यात ९६ गुण मिळाले आहेत. महाविद्यालयाने तीन प्राथमिक चाचण्या घेतल्या होत्या. त्याचा त्याला फारच फायदा झाला. ९० टक्क्यापर्यंत गुण मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, महाविद्यालयातून प्रथम येईल, असे त्याला वाटले नाही. क्रिकेट खेळणे आणि टिव्ही पाहणे त्याला आवडते. त्याने जेईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली असून येत्या दोन जूनला होऊ घातलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्सची तो तयारी करीत आहे.
अस्मिता गेडेकर
दहावीत ९८.३६ गुण मिळवून विदर्भातून टॉपर आलेल्या अस्मिताने बारावीतही तिची घौडदौड कायम ठेवत शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून मुलीत प्रथम येण्याचा मान मिळवला. वडील राजेश गेडेकर महाराष्ट्र अध्ययन मंदिर हायस्कुलमध्ये शिक्षक आहेत तर आई रत्ना गृहिणी आहेत. अस्मिताने दहावी गजानन हायस्कुलमधून केले होते. तिला ६०० पैकी ५७७ गुण मिळाले. पदार्थविज्ञान विषयाचा ती नियमित अभ्यास करायची. तिला वैद्यकीय सेवेत जायचे असून उत्कृष्ट सर्जन व्हायचे आहे. पदार्थविज्ञान या कठीण विषयाचा अनुभव सांगताना अस्मिता म्हणाली, मेडिकलला जायचे आधिच ठरवले होते. मात्र, कुठल्याच विषयात स्कोअर कमी नको म्हणून मला अवघड वाटणाऱ्या पदार्थविज्ञान विषयाकडे जास्त लक्ष पुरवले. त्यामुळे या विषयात ९९ गुण मिळाले तर जीवशास्त्रात ९७ गुण मिळाले. अभ्यासक्रम खूप मोठा असल्याने अभ्यास होईल की नाही, म्हणून भिती वाटायची. अशावेळी आईबाबांनी प्रोत्साहन दिले. मनातली भिती काढली. गेल्यावर्षीपर्यंत एकाच विषयाचे दोन पेपर असायचे. यावर्षी पदार्थविज्ञान भाग एक आणि भाग दोन एकत्रच द्यावे लागल्याने टक्केवारी घटल्याची खंत अस्मिताने व्यक्त केली.

Story img Loader