विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने व्यथित झालेले निष्ठावान नेते बाबुराव कुळकर्णी मुंबईस रवाना झाले आहेत. ‘हेचि फळ काय मम तपाला?’ असा सवाल ते आता मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व अन्य नेत्यांसमोर उपस्थित करणार आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याचा निरोप देऊन त्यासाठी सर्व तयारी करायला लावायची आणि ऐनवेळी मात्र ‘ए बी फॉर्म’ द्यायला नकार द्यायचा, ही बाब त्यांच्या जिव्हारी लागली. यापूर्वी अनेकदा आपणास उमेदवारी दिली नाही. त्यावेळी आजच्या एवढे ते व्यथित झाले नव्हते, कारण त्यांच्यावर आजच्यासारखी वेळ आली नव्हती. प्रारंभीच उमेदवारी दिल्याचे श्रेष्ठींनी सांगितले असते तर अर्ज भरण्यास आपल्या समर्थक, हितचिंतकांना औरंगाबादमध्ये बोलवलेच नसते, असे ते म्हणतात.
औरंगाबाद व जालना जिल्ह्य़ांत काँग्रेसमधील जे पुढारी नगरपरिषदेच्या राजकारणातून पुढे आले, त्यात सुरेश जेथलिया, अनिल पटेल, अब्दुल सत्तार यांच्यासोबतच बाबुराव कुळकर्णी हेही एक आहेत. यापैकी बाबुराव वगळता उर्वरित तिघे आमदार पदापर्यंत पोहोचले. परंतु त्यांच्यासारखे बाबुरावांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. या वेळेस बाबुरावांची उमेदवारी ऐनवेळी नाकारताना पक्षातील तसेच सहकारी पक्षातील पुढाऱ्यांना राजकीयदृष्टय़ा काय सोयीस्कर ठरेल, याचा विचार झाल्याची चर्चा जिल्ह्य़ातील राजकीय वर्तुळात आहे.
या निमित्ताने अशीच काही जुनी उदाहरणे बुजूर्ग कार्यकर्त्यांना आठवून गेली. औरंगाबाद व जालना जिल्हा एकत्र असताना १९८० च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ज्ञानेश्वर भांदरगे यांनी असाच अनुभव घेतला होता. त्यावेळी बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भांदरगे यांना इंदिरा काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यावर अर्ज भरून त्यांनी प्रचाराची सुरुवातही केली. विशेष म्हणजे औरंगाबादच्या आमखास मैदानावर झालेल्या जाहीर सभेत इंदिरा गांधी यांनी भांदरगेंना बदनापूरमधून विजयी करण्याचे आवाहनही केले होते. परंतु इंदिरा गांधी चिकलठाणा विमानतळावर परतल्या आणि तेथे भांदरगे यांनी अर्ज परत घेण्यास सांगण्यात आले.
आताही बाबुराव कुळकर्णी यांच्याऐवजी ज्यांना उमेदवारी दिली, त्यांनी ५ वर्षांपूर्वी हीच निवडणूक काँग्रेसविरोधात लढविली होती. स्वपक्षातील दावेदारांना डावलून अन्य पक्षातून आलेल्यांना उमेदवारी देण्याचे प्रकार जिल्ह्य़ात भारतीय जनता पक्षातही घडले आहेत. १९९६ मध्ये भाजपने बुजुर्ग नेते पुंडलीकराव दानवे यांना उमेदवारी नाकारून अन्य पक्षातून आलेल्या उत्तमसिंह पवार यांना दिली. १९९६ व १९९८ या दोन्ही लोकसभा निवडणुकांत ते जालना मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले. पुढे ते काँग्रेसमध्ये गेले. दोन वेळेस लोकसभेवर निवडून आलेल्या भाजप नेते दानवे यांचे चिरंजीव चंद्रकांत यांना तर भाजपने जि. प.ची उमेदवारीही नाकारली होती. पुढे तेच चंद्रकांत दानवे भोकरदनमधून विधानसभेसाठी तीन वेळेस राष्ट्रवादीकडून निवडून आले. सुरेश जेथलिया एकेकाळी काँग्रेसमध्ये होते. पुढे त्यांची शिवसेनेने विधान परिषद सदस्यपदी वर्णी लावली. परंतु नंतर ते परतून विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष म्हणून निवडून आले. आता पुन्हा काँग्रेसच्या व्यासपीठावर त्यांचा वावर वाढला आहे. १९९५ मध्ये काँग्रेसने वजनदार नेते दिवंगत बाळासाहेब पवार यांना बदनापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारून अरविंद चव्हाण यांना दिली. बाळासाहेब अपक्ष म्हणून उभे राहिले. पुढे अरविंद चव्हाण बदनापूरमधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले.
बाबुराव कुळकर्णी यांना काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ाच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा आहे. बाबुरावांचे आमदार होणे जिल्ह्य़ातील काँग्रेस पक्षासाठी किती अनुकूल ठरले असते, त्यापेक्षा राष्ट्रवादीसाठी ते किती अडचणीचे ठरले असते. याचीच चर्चा अधिक आहे. बाबुरावांच्या आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीचे संदर्भही कार्यकर्ते या अनुषंगाने देत आहेत. हा सर्व पुढाऱ्यांच्या व गैरसोयीच्या राजकारणाचा खेळ असल्याचा ‘अर्थ’ काढून मतदार नसलेले कार्यकर्ते याकडे एखाद्या प्रेक्षकाच्या भूमिकेतून पाहत आहेत.