सचिवांच्या बेताल वर्तणूकीमुळे नेहमी वादग्रस्त ठरलेल्या वध्र्यालगतच्या नालवाडीच्या ग्रामपंचायत सचिवास आता जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी दारू पिउन हुज्जत घालण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वध्र्यालगतच्या सर्वात श्रीमंत वसाहतीचा परिसर म्हणून नालवाडी ग्रामपंचायत ओळखल्या जाते. ग्रामपंचायतीचा कारभार नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. अशाच एका प्रकरणात पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्याकडे तक्रार आल्यावर त्यांनी जि.प.मुख्याधिकारी शेखर चन्न्ो यांना चौकशीचे आदेश दिले.
याविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी नालवाडीचे ग्रामपंचायत सचिव सतीश गोडे यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. त्यावेळी परिसरातच असणाऱ्या गोडेंना गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षेत नेले. दारुडय़ा सचिवाची दशा पाहून त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना वर्धा पोलिसांकडे तक्रार करण्यास सुचविले. वर्धा पोलीसांनी सचिव गोडे यास त्वरित अटक केली. गुरूवारी रात्री दहा वाजता त्याची जामिनावर सुटका झाली. आज त्याच्यावरील पुढील प्रशासकीय कारवाई अपेक्षित होती. मुख्याधिकारी कामकाजात असल्याने निर्णय नंतर होईल, अशी माहिती उपमुख्याधिकारी राजेंद्र भुयार यांनी दिली. नालवाडीच्या नाल्यांच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या परिसरात जमिनीला सोन्यासारखा भाव असल्याने सरपंच व सचिवाची भूमिका महत्वाची ठरते. यांच्यातील नेहमी होणाऱ्या वादाने गत दोन वर्षांत पाच सचिवांवर आतापर्यंत कारवाई झाली आहे. सचिवांच्या बचावार्थ काही स्थानिक लोकप्रतिनिधी पोलीस ठाण्यात पूर्ण वेळ हजर होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा