काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत फेरीवाल्यांना हटविताना वादग्रस्त ठरलेला, तसेच एका नगरसेविकेला ठार मारण्याची धमकी देणारा पालिकेचा अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचारी दिलीप भंडारी उर्फ बुवा याला शुक्रवारी दुपारी तीन फेरीवाल्यांनी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ बेदम मारहाण केली.
डोंबिवलीत फेरीवाल्यांना हटविताना वादग्रस्त ठरल्याने आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी भंडारी यांची कल्याणमध्ये ‘क’ प्रभागात प्रभाग अधिकारी गणेश बोराडे यांच्या कार्यालयात बदली केली होती. या कार्यालयात भंडारी यांच्यावर फेरीवाल्यांना हटविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.  शुक्रवारी दुपारी नेहरू चौकात फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई सुरू असताना आनंद गायने हा फेरीवाला आपल्या दोन साथीदारांसह आला. त्याने भंडारी यांना आपल्या जप्त केलेल्या हातगाडीबद्दल जाब विचारला आणि तिघांनी मिळून त्यास बेदम मारहाण करून पळ काढला. प्रकाश म्हात्रे यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Story img Loader