इचलकरंजी शहरातील छोटय़ा फेरी विक्रेत्यांना स्वखर्चाने दुकानगाळे बांधून देण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी बुधवारपासून नगरपालिकेसमोर विक्रेत्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. तत्पूर्वी विक्रेत्यांनी काळ्याफिती लावून नगरपालिकेवर मूकमोर्चा काढून नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर यांना निवेदन दिले. सायंकाळी याप्रश्नी आमदार सुरेश हाळवणकर व विरोधी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी एम.देवेंद्रसिंग यांच्याशी चर्चा केली. मात्र मुख्याधिकारी आपल्याच मागणीवर ठाम राहिल्याने तोडगा निघू शकला नाही.
इचलकरंजी शहरातील छोटे व्यापारी व फेरीविक्रेते यांचे पुनर्वसन करण्याचा, त्यांना स्वखर्चाने दुकानगाळे बांधून देण्याचा ठराव शहर विकास आघाडी सत्तेत असताना झाला होता. त्यास जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. मात्र राजकीय वादामध्ये हे काम प्रलंबित पडले आहे. त्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी, फेरीवाले संघटनेच्या वतीने नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. त्यामध्ये पंडित कोरवी, हनुमंत कांबळे, रशिद कोतवाल, आनंद गदंडे यांचा समावेश आहे.
दरम्यान या प्रश्नासाठी बुधवारी छोटे व्यापारी व फेरीविक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवून मोर्चा काढला. काळ्याफिती बांधलेले विक्रेते मूकमोर्चाने नगरपालिकेत गेले. निवेदन स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा गोंदकर यांनी ७ जानेवारी रोजी सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले.    
दरम्यान याप्रश्नी सायंकाळी आमदार हाळवणकर, आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, तानाजी पोवार यांच्यासह अन्य नगरसेवकांनी मुख्याधिकारी एम.देवेंद्रसिंग यांच्याशी चर्चा केली. मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे मार्ग निघू शकला नाही.
 दगडफेकीत नगरसेविकेचे पती जखमी    
नगरपालिकेसमोर एकीकडे उपोषण सुरू असताना दुसरीकडे नगरपरिषदेच्या काचा दगड फेकून फोडण्यात आल्याने खळबळ उडाली. नगरसेविका तेजश्री भोसले यांचे पती शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती पै.अमृता भोसले हे जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला. मात्र ते मिळून न आल्याने दगडफेकीचे कारण समजू शकले नाही. या प्रकारानंतर नगराध्यक्षा गोंदकर, नगरसेवक, अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊा पाहणी केली.
 

Story img Loader