कल्याणच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांना रेल्वे स्थानक परिसरात स्कायवॉकची उभारणी करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी बांधलेत की फेरीवाल्यांसाठी असा प्रश्न पडू लागला आहे. या स्कॉयवॉकवर फेरीवाले, वेश्या आणि भिकाऱ्यांचा अहोरात्र राबता असल्याने पालिकेच्या बुधवारच्या स्थायी समितीत सदस्यांनी पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध तोफ डागली.
‘क’ प्रभागाच्या अधिपत्याखाली स्कायवॉक येतो. या फेरीवाल्यांकडून पालिका कर्मचारी, रेल्वे पोलीस आणि स्थानिक शहर पोलिसांना नियमित हप्ता मिळतो. त्यामुळे या फेरीवाल्यांवर ‘क’ प्रभागाचे कर्मचारी कारवाई करीत नाहीत, असा आरोप प्रकाश पेणकर यांनी समितीच्या बैठकीत केला.
पालिकेचे प्रकल्प अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी सांगितले, स्कायवॉक हा एमएमआरडीएच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे स्कायवॉकवरील गैरप्रकार रोखण्याची जबाबदारी त्यांची आहे. या स्कायवॉकवरील गैरप्रकार रोखण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. एमएमआरडीएबरोबर बैठक घेऊन फेरीवाल्यांवर कारवाई सुरू करण्यात येईल. कुलकर्णीच्या वक्तव्याने सदस्य संतप्त झाले.

Story img Loader