* दादर : तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून भागेना!
दादर आणि फेरीवाल्यांचे समीकरण कायमस्वरूपी गुंतागुंतीचे आहे. दादर हे एकाचवेळी फेरीवाल्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि कुप्रसिद्धही. पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांना जोडणारे (स्थानकाबाहेरील लोखंडी आणि आतील सर्व) पुल पार करणे ही रोजची शिक्षा लाखो मुंबईकर रोज भोगतात. क्वचित कधीतरी फेरीवाल्यांना हटविण्याचा देखावा केला जातो. गंमत म्हणजे पुलाचा दादर पश्चिमेकडचा भाग फेरीवाल्यांनी व्यापलेला असताना मध्य रेल्वेच्या फलाटांच्या समोरचा पट्टा जवळपास मोकळा. कारवाईचा फार्स उलटल्यावर एका विक्रेत्याला विचारले तर ‘वो साईड जीआरपीका सिनियर बैठने नहीं देता’ असे उत्तर येते. याबाबत एका रेल्वे पोलिसाला विचारले तर, ‘कारवाईचे अधिकार महानगरपालिकेकडे आहेत. आम्ही फक्त त्यांना मदत करतो. आम्ही फेरीवाल्यांना हाकलत असतो. पण थोडय़ा वेळात परत येतात.’ असे उत्तर मिळाले. जी अवस्था पुलावर तीच रेल्वेस्थानकाबाहेर. दादर पश्चिमेला रस्ता आणि पदपथ वाहने आणि पादचाऱ्यांसाठी नव्हे तर फेरीवाल्यांसाठीच तयार झाला असावा, असे वाटते. शिवाजी पार्क पोलिस चौकी आणि तेथेच असलेले पालिकेचे कार्यालय यांच्या अखत्यारीत हा भाग मोडतो. पालिकेच्या गाडय़ा फिरतात पण त्या ‘कामाचा भाग’ म्हणून. त्यांचा काही परिणाम फेरीवाल्यांच्या गर्दीवर होत नाही. पोलीस, पालिका कर्मचारी, स्थानिक दादा यांना सांभाळून घेऊन हजारो फेरीवाल्यांचा व्यवसाय राजरोस सुरू आहे.एका पोलीस अधिकाऱ्याकडे सहज विचारणा केली तर, ‘हजारो फेरीवाले झाले आहेत. किती वेळ कुणाला हटकणार. कठोर निर्णय झाल्याशिवाय ही गर्दी हटणार नाही. हे फेरीवाले छोटय़ा-मोठय़ा वस्तू विकून पोट भरतात. उद्या हा रोजगार हातातून गेला की रिकामे हात आणि रिकामे डोके यामुळे ते कोणत्या मार्गाला लागतील हाही विचार करावा लागेल’ असे कोडय़ात टाकणारे उत्तर मिळाले.
* बोरिवली स्थानक परिसराची घुसमट
कपडे, चपला, पर्सेस, बॅगा, भाजीपाला, फळे, भांडीकुंडी अशा ‘संसारोपयोगी’ वस्तूंच्या भाऊगर्दीत बोरिवली रेल्वे स्थानकाचा परिसर घुसमटून गेला आहे. बोरीवलीचा फेरीवाल्यांचा प्रश्न हा बहुतेककरून रेल्वे स्थानकाच्या आसपासच घुटमळतो. महत्त्वाचे म्हणजे इथले रस्ते आणि पदपथ कुठेच धड नाहीत. रस्ता आणि पदपथामधील फरकच ओळखू येत नाही. पाणीपुरी, सॅण्डविच आदी खाद्यपदार्थाच्या गाडय़ा आणि या खाद्यपदार्थावर ताव मारण्यासाठी जमलेल्या खवय्यांमुळे गर्दीत आणखीच भर पडते. सध्या स्थानकालगत स्वामी विवेकानंद मार्गावर दुरूस्ती सुरू आहे. त्यामुळे, तर आता हा परिसर म्हणजे चक्रव्यूहच बनला आहे. फेरीवाल्यांनी स्थानक परिसरातील जवळपास सर्वच बसस्टॉपवर बस्तान बसविले आहे. हे चित्र दिवसाच्या कोणत्याही वेळेस कायम असते. सायंकाळच्या सुमारास गर्दीचा कहर झालेला असताना तर बसची रांग कुठली आणि फेरीवाल्यांकडे खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक कोणते हेच समजत नाही. हे सगळे स्थानकासमोरील पोलीस ठाण्याच्या नाकावर टिच्चून होते, हे विशेष. चारकोप, गोराई या ठिकाणी जाणाऱ्या बसस्टॉपच्या बाजूलाच हे पोलीस ठाणे आहे. पण पोलीस ठाण्यात जाणाऱ्या अधिकाऱ्यांनाच मोठय़ा मुश्कीलीने तेथून फेरीवाल्यांच्या गर्दीतून रस्ता काढावा लागतो तेथे पोलीस सामान्यांच्या मदतीसाठी फेरीवाल्यांना हटवतील, कोणी ‘ढोबळे’ येथे येईल, असे स्वप्नसुद्धा कधी बोरिवलीकरांना पडत नाही.
* चेंबूर : पदपथ शिल्लकच नाही
चेंबूर पूर्व, मानखुर्द, या रेल्वेस्थानकांबाहेर पदपथ शिल्लकच राहिलेला नाही. पोलिसांच्या बिट चौक्या, महापालिकेची कार्यालये यांनाही फेरीवाल्यांचा विळखा पडलेला आहे. रस्ता अरुंद आणि पदपथ शिल्लक नाही, मग चालायचे कुठून, असा सवाल गार्गी त्रिपाठी यांनी केला. फेरीवाल्यांसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर फेरीवाले औषधालाही दिसत नाहीत. त्यामुळे त्या जागेचा वापर लोक पार्किंगसाठी करतात. यासंबधी महापालिकेने माहितीच्या अधिकाराखाली दिलेल्या उत्तरामध्ये रेल्वे स्थानका बाहेरील परीसर फेरीवाला मुक्त नसतो असे म्हटले आहे. २००३ साली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त आहे का, असे माहितीच्या अधिकाराखाली पालिकेला विचारण्यात आल्यानंतर पालिकेने त्यावर ‘हा परिसर फेरीवालामुक्त नसतो.’ असे स्पष्ट उत्तर दिले आहे. फेरीवाले पदपथावर तर कब्जा करतातच; पण पाण्याची आणि वीजेचीही चोरी करतात, असे सामाजिक कार्यकर्ते हेमंत भास्कर यांनी सांगितले. तर अर्थिक हितसंबधामुळे फेरीवाल्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस सरंक्षण पुरवित असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश सामंत यांनी केला.
सर्वोच्च न्यायालय काय म्हणते
* रस्त्यावर फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही
* रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ असल्यास आणि तो दीड मीटरपेक्षा रुंद असल्यास फक्त एकाच बाजूच्या पदपथावर एक बाय एक मीटर क्षेत्रातच (फक्त) फेरीवाल्यांना व्यवसायाला मुभा
* टेबल, स्टँड, हातगाडी, गाडी किंवा काहीही सांगाडा उभारता येणार नाही
* शिजविलेले खाद्यपदार्थ, फळांचे तुकडे, ज्यूस विकता येईल, खाद्यपदार्थ शिजविण्यास मनाई
* सकाळी ७ ते रात्री १० या वेळेतच व्यवसाय
* परवान्यावर छायाचित्र लावून तो गळ्यात घालून स्वत: व्यवसाय करण्याची अट
* महापालिकेचे शुल्क भरण्याची अट, मात्र तो व्यवसायाचा परवाना नाही
* शाळा, रुग्णालये, प्रार्थनास्थळांपासून १०० मीटर परिसरात तसेच पालिका मंडईपासून १५० मीटर परिसरात मनाई.