ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी दिवसभर नारळ पाणी घेतले आहे. उपोषणामुळे काही प्रमाणात अशक्तपणा जाणवत असल्याने वैद्यकीय पथकाने त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
जनलोकपाल विधेयकासाठी राळेगण सिद्धी येथे हजारे यांनी नऊ  दिवस उपोषण केले. यामुळे त्यांचे वजन सव्वापाच किलोने घटले आहे. अशक्तपणाही मोठय़ा प्रमाणात जाणवत होता. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर बुधवारी हजारे यांनी उपोषण मागे घेतले. गुरुवारी त्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय पथकाचे प्रमुख डॉ. पोपट सोनवणे यांनी सांगितले.
उपोषणामुळे अशक्तपणा आल्याने हजारे यांनी हिंद स्वराज ट्रस्टच्या खोलीमध्येच विश्रांती घेतली. ते दिवसभर बाहेर आले नाहीत. नारळपाणी व ज्यूस असे द्रवपदार्थ त्यांनी घेतले. अजूनही दोन ते तीन दिवस केवळ द्रवपदार्थच घेण्याचा सल्ला त्यांना वैद्यकीय पथकाने दिला. गुरुवारी तपासणी करणाऱ्या पथकात ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित चंदनवाले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर, नोबल हॉस्पिटलचे डॉ. दिलीप माने व डॉ. पोपट सोनवणे यांचा समावेश होता. जिल्हास्तरीय वैद्यकीय पथक अजून काही दिवस हजारे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहे.