चंद्रपूर येथील महाऔष्णिक वीज केंद्रातून मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तेथील वीज केंद्र, महाजनको, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आदींवर नोटिसा बजावल्या आहेत.
चंद्रपूर येथील महाऔष्णिक वीज केंद्रातून पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या संचातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे प्रचंड प्रदूषण होते. या धुरातून राख, अ‍ॅल्युमिनियम, पारा यासारखे आरोग्याला घातक व संसर्गजन्य रासायनिक पदार्थ बाहेर पडतात. १५० मिलीग्रॅम प्रति एलएम क्यूब या मर्यादेपेक्षाही जास्त प्रमाणात (३५०, ३८० मिलीग्रॅम) रसायने बाहेर पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर शहरातील अनेक नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परीणाम होत आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीज केंद्राच्या प्रशासनावर अनेकदा नोटिसा बजावल्या. मात्र, प्रदूषण कमी न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते बंडू धोत्रे यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका सादर केली.
या प्रकरणी न्या. बी.पी. धर्माधिकारी व न्या. अतुल चांदूरकर यांनी  चंद्रपूरचे महाऔष्णिक वीज केंद्र, महाजनको, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आदींवर नोटिसा बजावल्या असून याप्रकरणी २९ जानेवारीला सुनावणी ठेवली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. नीरज खांदेवाले बाजू मांडत आहेत.
दरम्यान, या महाऔष्णिक वीज केंद्रातील दोन्ही धूळ नियंत्रण केंद्र काम करीत नसल्याचे उघड झाले आहे. वीज निर्मितीसाठी कमी दर्जाचा कोळसा, धुळीवर नियंत्रण ठेवणारे यंत्र निकामी, कमी उंचीच्या चिमण्या यामुळे चंद्रपूर शहरावर नियमितपणे राखेचे ढग दिसून येतात. राख नदीत मिसळले जात असल्याचेही लपून राहिलेले नाही.

Story img Loader