कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सावळ्या गोंधळाला परिसरातील ग्रामस्थ आता कंटाळले आहेत. केंद्रात बहुतांश वेळेस डॉक्टरच नसतात, आता तर येथे चौकशी अधिकारीच नसल्याचे सांगण्याते येते.
कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्राला यापुर्वी आदर्श पुरस्कार मिळाला होता. मात्र मागील काही महिन्यांपासून आरोग्य केंद्राची पुरती दुर्दशा झाली आहे. दुरावस्था झाली आहे. येथे दोन प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. मागच्या सहा महिन्यात ४ वैद्यकीय अधिकारी येथे येऊन गेले. सध्या येथे श्रीमती डॉ. व्ही. एस. गुत्ते व डॉ. एस. यू. राऊत यांची नेमणूक आहे. हे दोघे येथे एका वेळी कधीच हजर रहात नाहीत. प्रत्येकजण आलटून पालटून आठवडाभर थांबत. आता तर या दोघांनी नोकरीचाच राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे सध्या येथे कोणीच नाही.
दवाखान्यात परिसरातील गरीब रूग्ण येतात, मात्र डॉक्टरांसाठी त्यांना ताटकळावे लागते. दूरचे रूग्ण व त्यांच्या बरोबर येणाऱ्या नातेवाईकांनाही त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. केंद्रातील परिचारिकाही येथे राहत नाही. या सर्व गैरव्यवस्थेबाबत तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब भोंडवे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दोन्ही आरोग्य अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याला दुजोरा दिला, मात्र राऊत यांना अद्यापि पदमुक्त केले नसल्याचे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा