सिंहस्थाची घटीका समीप येत असताना निधीअभावी म्हणा अथवा अन्य कारणांमुळे अनेक महत्वपूर्ण कामे अद्याप गटांगळ्या खात असल्याचे लक्षात येते. सिंहस्थात नाशिक व त्र्यंबक येथे लाखो भाविक दाखल होणार असल्याने आरोग्य विभागाने त्या अनुषंगाने तयारी चालविली आहे. तथापि, नियोजन करताना गृहित धरलेल्या काही बाबींवर ऐनवेळी अन्य पर्याय काढण्यास सुचविले जात आहे तर पुरेसा औषधसाठा, अतिरिक्त मनुष्यबळ व अन्य वैद्यकीय साधनसामग्री यासारखी कामे निधी उपलब्ध होत नसल्याने रखडली आहेत. वरिष्ठांकडून दैनंदिन खर्चातून ही कामे करण्याचे आदेश आले असले तरी अतिरिक्त मनुष्यबळ, औषधसाठय़ाचे काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आगामी कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर आला असताना आरोग्य विभागाची अनेक कामे केवळ निधीअभावी रखडली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत योग्य वैद्यकीय सेवा देता यावी यासाठी जिल्हा रुग्णालयात २०० खाटांचे वाढीव बांधकाम, त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत ७० खाटांचे वाढीव बांधकाम, वैद्यकीय अवजारे व उपकरणे, किरकोळ साहित्य, प्रयोगशाळा, पुरक सेवेंतर्गत आहार, स्वच्छता, धुलाई आदी कामांसाठी १०.३३ कोटीची मागणी करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. रुग्णालयाने वाढीव बांधकामाला प्राधान्य देत कामास सुरूवात केली. यासोबत इतर बाबी मांडण्यात आल्या होत्या.
औषध साठय़ासह प्रयोगशाळा, त्यासाठी आवश्यक कुशल कर्मचारी, तंत्रज्ञ, पर्वणी काळात काही अनुचित प्रकार घडल्यास अतिरिक्त मनुष्यबळाची कंत्राटी पध्दतीने नेमणूक, वर्षभरासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, साफसफाई कर्मचारी आदीसाठी तीन कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीची मागणी आहे. या शिवाय २५ नव्या रुग्णवाहिकेसाठी एक कोटी ७५ लाख, वाहन देखभाल व इंधन यासाठी निधीची गरज भासणार आहे. पुरेशा औषध साठय़ासाठी तीन कोटी रुपे मागण्यात आले आहे.
तपोवन, साधुग्राम, गोदा परिसरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पर्वणी काळात आरोग्य सेवा देण्यासाठी फिरते रुग्णालय स्थापन केले जाणार आहे. त्यात आवश्यक मनुष्यबळासह औषधसाठा उपलब्ध करून दिला जाईल. तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे ‘रेस्क्यु कॅम्प’चे नियोजन आहे.
राज्य सरकारच्या शिखर समितीने या संदर्भातील काही कामे मंजूर करून दिली असली तरी अद्याप रुग्णवाहिका, औषध तसेच अतिरिक्त मनुष्यबळासाठी पुन्हा एकदा निविदा मागविण्यात आल्या आहेत. वास्तविक, एप्रिल अखेपर्यंत ही सर्व कामे मार्गी लागणे अपेक्षित असतांना निधीअभावी त्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. प्रस्तावित कामातील २५ नव्या रुग्ण वाहिका घेण्याचा प्रस्ताव समितीने फेटाळला असून नाशिक विभागातील धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर आदी ठिकाणाहून या रुग्णवाहिका मागविण्यात याव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेप्रमाणे अतिरिक्त लागणारे मनुष्यबळ ही अन्य भागातून प्रतिनियुक्तीवर उपलब्ध करून घ्यावे. औषधसाठा जिल्हा रुग्णालयाने आपल्या दैनंदिन कामातून उपलब्ध करून घ्यावा आदी सूचना करण्यात आल्या आहेत.
नियोजनातील निर्णय बदलले जात असल्याने आरोग्य विभागाची कसरत होत आहे. प्रतिनियुक्तीतील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण असे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.

Story img Loader