आरोग्यसेवेसाठी रुग्ण आता शासकीय रुग्णालयाकडे वळू लागले आहेत ही चांगली बाब असून, आरोग्य विभागाने रुग्णांना अजूनही चांगली सेवा देऊन रुग्णांचा विश्वास संपादन करावा, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व ग्रामसंजीवनी अंतर्गत येथील वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने आयोजित आरोग्य महामेळावा आणि प्रदर्शनाचे उद्घाटन आनंदराव पाटील यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, उपसभापती विठ्ठलराव जाधव, नगराध्यक्ष प्रा. उमा हिंगमिरे, नगरसेविका अरुणा जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, डॉ. अविनाश पाटील, डॉ. सुश्रुत पुराणिक, डॉ. महेंद्र जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. एच. मदने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कोरबू, डॉ. दीपक साळुंखे उपस्थित होते.
आनंदराव पाटील म्हणाले, की पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदी कार्यभार स्वीकारल्यापासून आरोग्य विभागाला भरीव निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्याची चांगली सुविधा मिळाली पाहिजे. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन सेवा घेणे परवडत नाही. त्याची दखल घेऊन रुग्णालयाच्या वतीने या आरोग्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले ही चांगली बाब आहे.
देवराज पाटील म्हणाले, की ग्रामीण भागातील अनेक लोकांची अजूनही आर्थिक स्थितीअभावी खासगी रुग्णालयातील सेवा परवडत नसल्याने शासकीय सेवेचा दर्जा चांगला ठेवला पाहिजे. ज्या गोरगरिबांना चष्मे लागले असतानाही त्यांची घेण्याची ऐपत नव्हती अशा गरजूंना पंचायत समितीमार्फत पुढील महिन्यात १६०० चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. कुपोषणमुक्तीसाठीही आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत.
भगवान पवार म्हणाले, की प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगली सेवा मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. विठ्ठलराव जाधव यांनी शहराबरोबरच ग्रामीण भागातही असे महाआरोग्य मेळावे घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. मदने यांनी केले.