आरोग्य सेवेच्या नाशिक मंडळातील पदोन्नतीत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना हेतूत: वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे. आरोग्य सेवा उपसंचालकांना यासंदर्भात निवेदनही देण्यात आले आहे.
नाशिक मंडळातील आरोग्य सेवेत कार्यरत तृतीयश्रेणी आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांपासून सेवाज्येष्ठतेनुसार, बिंदुनामावलीप्रमाणे पदोन्नतीसाठी पात्र असतानाही मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ झालेला नसल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे. मंडळाच्या बिंदुनामावली पद्धतीत संशयास्पद बाबींचा समावेश असून त्यात अनियमितता दिसून येते. सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेमध्ये शासकीय नियमबाह्य़ प्रकार होताना दिसतात. पदोन्नतीच्या बाबतीत वशिलाबाजी, आर्थिक देवाण-घेवाण होताना दिसते. अनुकंपा तत्त्वावरील काही उमेदवारांना सर्रासपणे थेट वरिष्ठ पदावर नियुक्ती देण्याचेही गंभीर प्रकार आपल्या कार्यालयाच्या वतीने झाले आहेत. या अशा प्रकारच्या गैरप्रकारामुळे पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे. १५ ते २० वर्षांपासून पात्र कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे पदोन्नती देण्याची मागणी समितीने केली आहे.
नाशिक मंडळातील तृतीयश्रेणी व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार, बिंदुनामावलीप्रमाणे तात्काळ पदोन्नती द्यावी, पदोन्नतीसंदर्भात होणारी अनियमितता, शासकीय नियमबाह्य़ गैरप्रकार त्वरित थांबवावेत, या मागण्याही करण्यात आल्या असून आठवडय़ात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.