सायंकाळी सातची वेळ.. प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरलेले ठाणे रेल्वे स्थानक. फलाट क्रमांक दोनवरून कल्याणकडे जाणारी लोकल पंधरा मिनिटे उशिराने स्थानकात दाखल होते आणि लोकलमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशांमध्ये अक्षरश: चेंगराचेंगरी सुरू होते. बघता बघता अपंग, कर्करोगाने आजारी असलेल्या रुग्णांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात धडधाकट प्रवाशांची घुसखोरी झाल्याचे पहावयास मिळते. दररोज गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकात सायंकाळी गर्दीच्या वेळेत हे चित्र नित्याचे बनले आहे. मध्य रेल्वे मार्गावर घाटकोपर आणि ठाणे स्थानकात अपंगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये घुसखोरीचे प्रकार वाढू लागल्याने या डब्यातील अपंग प्रवासी चेन खेचून लोकल थांबवू लागले आहेत. त्यामुळे या दोन स्थानकांतून गर्दीच्या वेळेत गाडी पुढे निघाली की कधी थांबेल याचा नेम राहिलेला नाही.  
रेल्वेकडून अपंगांसाठी विशेष डब्यांची व्यवस्था करण्यात आली असली तरी मर्यादित असलेल्या या डब्यांमध्ये इतर प्रवाशांच्या घुसखोरीचे प्रकार नवे नाहीत. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे, घाटकोपर अशी स्थानके गर्दीची मानली जातात. या स्थानकांमध्ये अपंगांच्या डब्यांमध्ये हमखास घुसखोरी होते, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तान्तला दिली. गर्दीच्या काळात अपंगांच्या डब्यात होत असलेल्या या घुसखोरीमुळे संतप्त अपंग प्रवासी चेन खेचून लोकल थांबवतात. गेल्या महिनाभरापासून हे प्रमाण वाढले असून याचा फटका उपनगरीय रेल्वे वाहतुकीला बसू लागला आहे. रेल्वेच्या वतीने देण्यात आलेल्या मर्यादित सेवेमध्ये योग्य न्याय मिळत नसल्याने अपंग प्रवाशांमध्ये संताप असून यावर रेल्वे प्रशासनदेखील हतबल ठरू लागले आहे. अपंग तसेच कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी राखीव असलेले डबे नेमक्या कोणत्या ठिकाणी आहेत याची माहिती व्हावी यासाठी खास इंडिकेटर्स ऊपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरीही इतर प्रवाशांची घुसखोरी या डब्यांमध्ये सुरूच आहे. गर्दीच्या काळात यावर नियंत्रण राखणे अवघड होत असल्याची कबुली रेल्वेचे अधिकारीदेखील देऊ लागले आहेत. तर हेल्पलाइन नंबरवर तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने अपंगांनी नेमके काय करायचे, असा सवाल अपंग प्रवाशांकडून विचारला जाऊ लागला आहे.
लोकल थांबवणे चुकीचे..
आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत असून अशा रीतीने कुणी प्रवास करत असेल, तर अपंग प्रवाशांनी हेल्पलाइनवर फोन करून तक्रार करणे गरजचे आहे. त्यांच्या तक्रारीवरून रेल्वे सुरक्षा दल योग्य कारवाई करत असते. मात्र चेन खेचून लोकल थांबवणे हादेखील गुन्हा असून ते चुकीचे आहे, असे मत मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई सुरू असून ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागांतून कारवाईच्या काळात ५० हून अधिक घुसखोर प्रवाशांना अटक केली जाते, अशी माहिती ठाणे रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
अपंगांच्या डब्यातील घुसखोरी थांबवणे गरजेचे असून त्याचा फटका लोकल सेवेला बसणार नाही याची काळजीदेखील अपंग प्रवाशांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अपंगांच्या डब्यातील घुसखोरीला रोखण्यासाठी गर्दीच्या काळात रेल्वे सुरक्षा दलाचे जवान फलाटावर उपस्थित राहून हे प्रकार थांबवले पाहिजेत. असे कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी वृत्तान्तशी बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा