पुण्यात बेदरकारपणे एसटी बस चालवून निरपराध नऊजणांचे बळी घेतले व ३५ जणांना जखमी केल्याबद्दल सोलापूरचा एसटीचालक संतोष माने यास पुणे सत्र न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने प्राथमिक सुनावणी घेऊन अपील दाखल करून घेतले आहे.
पुण्यात २५ जानेवारी २०१२ रोजी स्वारगेट बसस्थानकातून एसटी बस चोरून ती रस्त्यावर बेदरकारपणे चालविली. यात नऊ निष्पाप जिवांचे बळी घेतले व ३५ जणांना जखमी केल्याबद्दल एसटीचालक संतोष माने (रा. कवठाळी, सोलापूर) यास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेविरुध्द आरोपीने अॅड. जयदीप माने (सोलापूर) यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर न्या. व्ही. के. तेहेलरामानी यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली. पुणे सत्र न्यायालयाने चुकीचे निष्कर्ष काढून आरोपी माने यास फाशीची शिक्षा दिली आहे. फौजदारी दंड संहिता कलम २३५ प्रमाणे शिक्षा सुनावण्यापूर्वी आरोपीला त्याचे म्हणणे ऐकून घेणे न्यायालयास बंधनकारक आहे. परंतु पुणेसत्र न्यायालयाने आरोपी संतोष माने यास देण्यात येणाऱ्या शिक्षेबद्दल काहीही विचारले नाही. ही चूक गंभीर स्वरूपाची आहे. आरोपीच्या मानसिक स्थितीबद्दल न्यायालयाने चुकीचे निष्कर्ष काढून आरोपीला दिलेली फाशीची शिक्षा रद्द होण्यास पात्र असल्याचा युक्तिवाद अॅड. जयदीप माने यांनी केला. सरकारतर्फे अॅड. व्ही. बी. कोंडे-देशमुख हे काम पाहात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा