विनातारण व नियमबाहय़ कर्ज दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या तत्कालीन अध्यक्ष आमदार अमरसिंह पंडित व सुभाष सारडा यांच्यासह ४ संचालकांच्या जामीनअर्जावर सोमवारी (दि. १४) सुनावणी होणार आहे. दरम्यान, दोन ठेवीदारांनी न्यायालयात आरोपींना जामीन देऊ नये, असे शपथपत्र दाखल केल्याने न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने ४ संस्थांना जवळपास ६० कोटींचे कर्ज विनातारण व नियमबाहय़ दिल्याप्रकरणी तत्कालीन २४ संचालकांवर प्रशासकांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल होताच संचालक मंडळ पसार झाले. तत्कालीन अध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित, सुभाष सारडा, जािलदर पिसाळ, मधुकर ढाकणे यांनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्जासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी ठेवली होती.
दरम्यान, संचालकांनी नियमबाहय़ कर्ज मंजूर केल्यामुळे व ते वसूल न झाल्याने बँकेत ठेवी अडकून पडल्या. आपल्या ठेवी अडकून पडण्यास गुन्हे दाखल झालेले तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असल्याने त्यांना जामीन देऊ नये, असे शपथपत्र दोन ठेवीदारांनी न्यायालयात दाखल केले. या शपथपत्रामुळे न्यायालय काय भूमिका घेते, याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा