सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळण्यासाठी गेली सहा दशके लढा देत असून शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत सीमावासीयांच्या सोबत राहणार आहे. सीमा लढय़ाची सूत्रे आता मराठी भाषिक युवकांनी आपल्या हाती घेऊन या लढय़ाला साथ द्यावी. सर्वोच्च न्यायालयात सीमालढय़ाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून तेथे मराठी भाषिकांना निश्चितपणे न्याय मिळणार आहे. तोपर्यंत हा लढा हिमतीने लढला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी सोमवारी बेळगाव येथे केले.     
कर्नाटक शासनाने सोमवारी बेळगावात हिवाळी अधिवेशनाचे आयोजन केले आहे. त्याच्या निषेधार्थ आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांनी आज महामेळाव्याचे आयोजन केले होते. सीमालढय़ाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, शिवसेनेचे मुंबईचे महापौर सुनील प्रभू, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, आमदार के. पी. पाटील, चंदगडचे माजी आमदार नरसिंग पाटील, सांगली-मिरज-कूपवाड महापालिकेतील सभापती, नगरसेवक आदींनी आज बेळगावात हजेरी लावून मराठी भाषिकांच्या लढय़ाला उमेद दिली.    
अध्यक्षीय भाषणात एन. डी. पाटील यांनी कर्नाटक शासनाच्या कन्नडधार्जिण्या आणि मराठी व्देषाच्या भूमिकेवर सडकून टीका केली. ते म्हणाले, सीमावासियांना महाराष्ट्र राज्यामध्ये सहभागी होण्याचा नैसर्गिक हक्क आहे. त्यासाठीचा लढा सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. तेथे या विषयाची सुनावणी सुरू असताना कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर जाणीवपूर्वक अन्याय करीत घटनेची पायमल्ली करून आपला बालिशपणा दाखवत आहे. त्यांचे धोरण सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. मराठी भाषिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठी भाषिकांना महाराष्ट्रात जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.    
महापौर सुनील प्रभू म्हणाले, मुंबई व शिवसेनेने नेहमीच सीमावासियांच्या लढय़ाला पाठिंबा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी या लढय़ाला दिशा दिली आहे. उद्धव ठाकरे यांनीही हिच भूमिका कायम ठेवीत सीमालढय़ाला खंबीरपणे पाठिंबा दर्शविला आहे. आमदार के. पी. पाटील यांनी अखंडपणे सुरू ठेवलेल्या मराठी भाषिकांच्या लढय़ाला करावा तितका सलाम थोडकाच आहे, असा उल्लेख करून शरद पवार यांचे सीमाप्रश्नासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.     
मेळाव्यात आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील, शहराध्यक्ष दीपक दळवी, तालुकाध्यक्ष निगोंजी हुद्दार, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, खानापूर तालुकाध्यक्ष विलास बेळगावकर आदींची भाषणे झाली.