ठरीव साच्याचे रहस्यमय थरारपट असतात तेव्हा पुढे काय घडणार हे चित्रपट पाहताना प्रेक्षकाला सहजपणे लक्षात येते. परंतु थरार आहे, रिअॅलिटी शोमधली गंमत, औत्सुक्य असूनही पडद्यावर जे दाखविले जातेय त्याचा आपल्या आयुष्यातील घटनांशी संबंध जोडला की जाणवणारे भय आणि असे खरेच घडले तर.. म्हणून प्रेक्षक आ वासून पाहतच राहील. ‘टेबल नंबर २१’ या सूचक शीर्षकातून दिग्दर्शकाने ते नेमकेपणाने दाखवून दिले आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकांना ‘भय इथले संपत नाही..’ हा अनुभव येईलच. परंतु त्याचबरोबर चित्रपटाचा हेतू अगदी शेवटी समजल्यावर चित्रपटाचा उलगडा नेमक्या पद्धतीने होईल. चित्रपटात दिलेल्या संदेशाचा परिणाम साधण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.
विवान अगस्ती (राजीव खंडेलवाल) आणि सिया अगस्ती (टीना देसाई) हे तरुण मध्यमवर्गीय दाम्पत्य. विवानला नोकरी नाही आणि सियाच्या पगारावर संसार चाललाय. दैनंदिन जीवनाला कंटाळलेल्या या दाम्पत्याला फूजी बेटावर फिरायला जाण्याची ‘चकटफू’ संधी मिळते. आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच असे ‘सरप्राइज’ मिळाल्यामुळे विवान-सिया दोघेही हरखून जातात. स्वप्नं रंगवत दोघेही फूजी बेटावर पोहोचतात. विमानाच्या बिझनेस क्लासमधून पहिल्यांदाच प्रवास करताना हरखून गेलेले हे दाम्पत्य फूजीमध्ये पोहोचल्यावर पंचतारांकित हॉटेलात राहणं-खाणं-फिरणं असं सगळं काही मोफत असल्यामुळे अधिकच सुखावतात. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या लग्नाचा पाचव्या वाढदिवशी विवानने दिलेले महागडा हार गळ्यात घालून सिया आपल्या नवऱ्याशी प्रेमालाप करीत असतानाच एक निमंत्रण येतं. एका आलिशान रिसॉर्टकडून आलेले निमंत्रण त्यांना मिळते. फूजीमध्ये आपल्या ओळखीचे कुणी नसताना लग्नाच्या वाढदिवशी निमंत्रण कुणी दिले याची खातरजमाही करून घेण्याच्या मन:स्थितीत विवान-सिया नाहीत. स्वप्नवत सृष्टीत आपण अवतरलेलो आहोत, हा भास आहे की वास्तव, असे द्वंद्वच जणू दोघांच्या मनात आहे. परंतु, आपल्या लग्नाच्या वाढदिवशी आलेले हे निमंत्रण स्वीकारायचे ते ठरवितात आणि त्यांना न्यायला आलेल्या गाडीत बसून रिसॉर्टवर जातात. रिसॉर्टचा मालक खान (परेश रावल) त्यांचे हषरेल्हासात स्वागत करतो, त्यांच्यासाठी बनविलेला खास केक ते खातात. आणखी दोन-तीन दिवस फूजीमध्ये राहायचं, फिरायचं आणि मग पुन्हा दैनंदिन जीवन नव्या आशेने जगायचे असे दोघेही मनात ठरवितात. परंतु खान त्यांना रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देतो. ‘टेबल नंबर २१’ या रिअॅलिटी गेम शोमध्ये जिंकल्यानंतर २१ कोटी रुपयांचे जॅकपॉट पारितोषिक मिळणार म्हटल्यावर विवान-सिया यांना पुन्हा एकदा धक्का बसतो. पैसे मिळाले तर आपले जीवन कितीतरी सुखकर करता येईल. त्यामुळे विवान-सियाच्या तोंडाला पाणी सुटते आणि ते मागचापुढचा विचार न करता सहभागी होतात. खेळ सुरू होतो आणि चित्रपट उत्तरोत्तर रंगत जातो. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराबरोबर विवानच्या खात्यात पैसे जमा होतात. खरं बोलायचं एवढाच या खेळाचा नियम आहे. हा खेळ कोणता आहे आणि त्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे हे २१ नंबरच्या टेबलवर बसल्यावर म्हणजेच चित्रपटगृहात गेल्यावरच प्रेक्षकांना समजेल. चित्रपटात एकामागून एक ‘टास्क’ विवान-सिया करतात आणि उत्कंठा वाढत जाते. प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात चित्रपट नक्कीच यशस्वी होतो.
दिग्दर्शकाने आणि चार लेखकांनी रिअॅलिटी शोमधील टास्क आणि प्रश्न आणि त्याचा विवान-सियाच्या आयुष्याशी आणि एक प्रकारे आपल्याही आयुष्याशी असलेला संबंध याची गुंफण यातून थरार निर्माण करण्यात यश मिळवले आहे. परेश रावलचे व्यक्तिमत्त्व, अभिनय याचा उत्तम नमुना असलेला हा चित्रपट आहे. वैशिष्टय़पूर्ण केशभूषा, त्यातून दिसणारी त्याची खलनायकी छटा, संपूर्ण सिनेमातील परेश रावलचा वावर यामुळे चित्रपटाचा अपेक्षित परिणाम साधण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला आहे. राजीव खंडेलवाल, टीना देसाई यांच्याकडून दिग्दर्शकाने चांगेल काम करवून घेतले आहे. ‘सच का सामना’ या रिअॅलिटी शोमध्ये राजीव खंडेलवाल होता. त्यामुळेच विवानच्या भूमिकेसाठी त्याला घेण्यात आले आहे. फूजी बेटावर विवान-सियाच्या बरोबरीने प्रेक्षक रमतो एवढे मात्र नक्की!
इरॉस इंटरनॅशनल निर्मित
टेबल नंबर २१
निर्माते- विकी राजानी, सुनील लुल्ला
दिग्दर्शक- आदित्य दत्त
लेखक- शीर्षक आनंद, शंतनू राय छिब्बर, आदित्य दत्त, अभिजित देशपांडे
संकलन- देवेंद्र मुर्डेश्वर
कलावंत- परेश रावल, राजीव खंडेलवाल, टीना देसाई, झरना छांत्याल, आशीष कपूर व अन्य.
भय इथले संपत नाही..
ठरीव साच्याचे रहस्यमय थरारपट असतात तेव्हा पुढे काय घडणार हे चित्रपट पाहताना प्रेक्षकाला सहजपणे लक्षात येते. परंतु थरार आहे, रिअॅलिटी शोमधली गंमत, औत्सुक्य असूनही पडद्यावर जे दाखविले जातेय त्याचा आपल्या आयुष्यातील घटनांशी संबंध जोडला की जाणवणारे भय आणि असे खरेच घडले तर..
First published on: 06-01-2013 at 12:18 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hears fear is not ending