गेल्या काही दिवसांपासून वाढलेला असह्य़ उकाडा, मतदाराच्या दारात जाऊन होणारे केवळ कुलुपाचे दर्शन आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव करताना उडणारी त्रेधातिरपीट.. हे सगळे टाळण्यासाठी आता उमेदवारांनी सकाळच्या सत्रातील प्रचारफेरीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी विविध समाजाच्या समित्या, गणेशोत्सव मंडळे आदींबरोबर बैठका आणि उन्हाच्या झळा कमी झाल्यावर संध्याकाळी प्रचारयात्रा असा बदल उमेदवारांनी आपल्या वेळापत्रकात केला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये उन्हाचा तडका वाढल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यातच निवडणुकांचे रण पेटू लागल्याने प्रचाराची रणधुणाळी सुरू झाली आहे. सकाळ-संध्याकाळ अशा दोन सत्रांमध्ये प्रचारयात्रा काढून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याकडे बहुतांश उमेदवारांचा कल होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. सकाळी प्रचारयात्रा सुरू होता होता घामाच्या धारा वाहू लागतात आणि वाढत्या थकव्यामुळे प्रचारयात्रेतील कार्यकर्त्यांची संख्या रोडावत जाते. परिणामी प्रचारयात्रा आटोपती घ्यावी लागते.
कार्यालयात दांडी मारून स्वत:चे नुकसान करून प्रचारयात्रेत सहभागी होण्यास अनेक कार्यकर्ते तयार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांची फौज उभी करताना उमेदवारांच्या नाकीनऊ आले आहेत. न्याहारी आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था करून कार्यकर्त्यांना प्रचारफेरीसाठी भुलविण्याचे प्रयत्न उमेदवारांना करावे लागत आहेत. मात्र आता उन्हाचा तडका वाढल्याने सकाळच्या प्रचारयात्रेत सहभागी होण्यास कार्यकर्ते राजी नाहीत. सकाळच्या सत्रातील प्रचारयात्रा साडेनऊ ते दहाच्या सुमारास सुरू होतात. काही वेळा प्रचारयात्रा सुरू होण्यास अकराही वाजतात. कार्यालय गाठण्यासाठी मतदारांची सकाळी सात-आठ वाजल्यापासूनच धावपळ सुरू असते. त्यामुळे साडेनऊ-दहाच्या सुमारास प्रचारयात्रा सुरू करून काहीच उपयोग होत नाही. प्रचारासाठी घरोघरी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना कडी-कोयंडय़ाला प्रचारपत्रक अडकवून परतावे लागते. मतदार भेटत नसल्यामुळे उमेदवार वैतागले आहेत. ज्यांच्यासाठी जातो तेच भेटणार नसतील तर सकाळची प्रचारफेरी काढून उपयोग काय, असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी आता उन्हाचा तडका कमी झाल्यानंतर संध्याकाळी प्रचारयात्रा काढण्यावर काही उमेदवार भर देऊ लागले आहेत. संध्याकाळी कार्यालयातून परतणारे आनंदाने प्रचारयात्रेत सहभागी होत असून मतदारांचीही भेट होत आहे. तसेच उन्हाच्या त्रासातूनही सुटका होत आहे. त्याचबरोबर समाजातील विविध घटकांतील नेते, समाजसेवक, गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेऊन एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी उमेदवार सकाळचा वेळ कामी लावताना दिसत आहेत.
तापमान स्थिरावले
तापमानाने मागील शुक्रवारी ३८ अंश सेल्सिअसचा आकडा गाठला. मात्र त्यानंतर ते ३२ ते ३३ अंशांदरम्यान स्थिरावले आहे. एप्रिलचे सरासरी तापमान ३३ अंश से. असते. ‘सध्या वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून आहे. समुद्रावरून सकाळी दहाच्या सुमारास वारे वाहू लागतात. त्यामुळे तापमान वाढत नाही. मात्र या वाऱ्यांसोबत येत असलेल्या मोठय़ा प्रमाणातील बाष्पामुळे उकाडय़ाची तीव्रता वाढते,’ असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. हवेत बाष्पाचे प्रमाण वाढल्यास घाम अधिक येतो. त्यामुळे लवकर दमछाक होते. सध्या हवेतील सापेक्ष आद्र्रतेचे प्रमाण सुमारे ९० टक्क्य़ांपर्यंत पोहोचले आहे. हिवाळ्यात हेच प्रमाण ५०-५५ टक्क्य़ांपर्यंत असते.