* उष्णतेची तीव्र लाट
* भुसावळमध्ये ४५ अंशांची नोंद
मेच्या उंबरठय़ावर उत्तर महाराष्ट्रातील तापमानाचा पारा झपाटय़ाने वर चढला असून प्रचंड उष्म्याने जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होणाऱ्या भुसावळ तालुक्याने ४५ अंशाची पातळी गाठली असून नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव व नंदुरबार या भागातील तापमानही त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्याची स्थिती असून वाढत्या तापमानामुळे उष्माघातापासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उत्तर महाराष्ट्रात आता खऱ्या अर्थाने टळटळीत उन्हाळ्याची दाहकता जाणवत आहे. मार्चपासून वाढणाऱ्या तापमानाने एप्रिलच्या अखेरच्या टप्प्यात ४० अंशांचा टप्पा ओलांडला आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकची वाटचाल त्या दिशेने होत असताना जळगाव जिल्ह्यातील तापमानात गेल्या तीन ते चार दिवसात कमालीचे बदल झाले. जळगावमध्ये ४२.६ अंशांचा टप्पा ओलांडला असताना भुसावळ तालुक्यात ४५ अंशांची नोंद झाली आहे. उन्हाच्या तीव्र झळा व चटके बसू लागल्याने या भागातील रस्ते दुपारच्या सुमारास ओस पडल्याचे दिसत आहेत. तापमानातील ही वाढ लक्षात घेऊन प्रशासनाने तालुक्यातील पालिकांच्या सर्वच रुग्णालये, उप जिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष सुरू केले आहेत. सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यात जळगावचे तापमान ४० अंशांचा टप्पा गाठते, असे अनुभव आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रताही जाणवू लागते.
यंदा १९ एप्रिल रोजी जिल्ह्यात पाऊस झाला. त्याचबरोबर ढगाळ वातावरण तयार झाल्याने तापमानात घसरण होऊन ते ३६ अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून पावसाविषयी चिंता व्यक्त होऊ लागली. तथापि, २४ तारखेपर्यंत ४० अंशावर स्थिरावलेल्या तापमानात चार दिवसात २.६ अंशांची वाढ झाली आहे. तापमानाने एप्रिलमध्ये ४२ अंशांचा टप्पा ओलांडल्याने पुढील महिन्यातील ‘मे हिट’च्या तडाख्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. भुसावळ तालुक्यात उन्हाने अक्षरश: कहर केला असून तेथील तापमान ४५ अंशांवर पोहोचले आहे.
जळगावसह मालेगाव, धुळे व नंदुरबार भागात उष्णतेची लाट आल्याची स्थिती आहे. नाशिकचेही तापमान त्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. एप्रिलच्या अखेरीस शहरातील तापमान ४० अंशाचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे दिवसभरातील पाच ते सहा तास सर्व प्रमुख बाजारपेठा, रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे दिसते. प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार पूर्णपणे थंडावतात. शासकीय कार्यालयांत दुपारी कामकाजात संथपणा आल्याचे पहावयास मिळते. जळगावमध्ये दुभत्या जनावरांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी गोठय़ाच्या अवती-भवती धान्याच्या रिकाम्या गोण्यांच्या मोठय़ा चादर बनवून त्या लावण्यात आल्या आहेत. या गोण्यांवर पाण्याचा शिडकावा करून गारवा निर्माण केला जातो. वाळाची तावदाने, टोप्या, पंखे, तत्सम वस्तुंच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे. तसेच आईस्क्रिम, थंड पेय, कलिंगड यांची मागणी वधारली आहे.
अधुनमधून गायब होणारी वीज आणि कित्येक तास केल्या जाणाऱ्या भारनियमनामुळे शहरी व ग्रामीण भागात दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. या एकूणच घटनाक्रमामुळे जनजीवन कोलमडून पडले आहे.