विदर्भात गेल्या पाच-सहा दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके जाणवायला लागले आहेत. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. विदर्भात आज सर्वाधिक तापमान चंद्रपूरला ४३.२, तर अकोला ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. विविध जिल्ह्य़ात सरासरीच्या तुलनेत जास्त तापमान नोंदवले गेले. होळीनंतर तापमानाने चाळीशी गाठल्यावर गेल्या चार पाच दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. दोन दिवसापूर्वी नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि वर्धा ४२.९ अंशावर गेले होते.
चंद्रपुरात उन्हाचा पारा हळूहळू वाढायला सुरुवात झाली असून शहरात आज ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. या संपूर्ण आठवडाभरात विदर्भात चंद्रपूर सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. चंद्रपूरचा उन्हाळा दरवर्षीच चर्चेत असतो. त्यानुसार यंदाही उन्हाळा तीव्र उन्हामुळे चर्चेत आहे. एप्रिल महिन्याला सुरुवात होताच सूर्याने आग ओकणे सुरू केले आहे.
 गेल्या आठवडय़ाभरात उन्हाने उष्णतेचा उच्चांक गाठला असून आज शनिवार, रविवार व सोमवार, असे सलग तीन दिवस ४३ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासूनच उन्हाळ्यानेने उष्णतेचे रंग दाखविण्यास सुरुवात केली होती. १ एप्रिलला जेथे ४०.८ अंश तापमानाची नोंद घेतली तेथे ८ एप्रिलला ४३.२ अंशावर पारा पोहोचल्याने लोकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारी बारा वाजतापासूनच शहरातील मुख्य रस्ते ओस पडत आहेत. निर्मनुष्य रस्त्यांवर केवळ ऑटो व बसेस धावतांना दिसतात. उष्णतेचा सर्वाधिक परिणाम शहरातील बाजारपेठेवर झालेला आहे. गोल बाजार, भाजी बाजार दुपारी पूर्णपणे शांत होतो. लग्नसराई असतांनाही दुपारी कपडा बाजार व इतर दुकानातही गर्दी दिसत नाही. याउलट, शीतपेयाची दुकाने, आईस्क्रीम पार्लर्स, कुल्फी सेंटरवर गर्दी बघायला मिळत आहे. दुपारी निर्मनुष्य असलेले रस्ते सायंकाळी ७ वाजतानंतर पुन्हा फुलू लागतात. हा उन्हाळा मे महिन्यात अधिक तीव्र राहील, असे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात येत आहे. साधारणत: ७ जूनपर्यंत तरी कडक उन्हाळा तापणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विदर्भातील विविध जिल्ह्य़ात सरासरीच्या तुलनेत जास्त तापमान नोंदवले गेले. होळीनंतर तापमानाने चाळीशी गाठल्यानंतर गेल्या चार पाच दिवसापासून तापमानात वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर, नागपूर, अकोला आणि वर्धा ४२.९ अंशावर गेले होते. तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे उष्णतामानात वाढ होत असताना दुसरीकडे ग्रामीण भागात आणि शहरातील काही भागात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक या भारनियममनामुळे त्रस्त झाले आहे. प्रखर उन्हामुळे चाकरमाने सोडले तर अनेक लोक सकाळी अकरानंतर घराबाहेर न पडता घरीच राहून एकदम सायंकाळी ५.३० नंतरच घराबाहेर पडतात. वाढते तापमान बघता जिल्हा परिषदेने जिल्ह्य़ातील शाळांच्या वेळेत बदल करून त्या सकाळी ७ ते १० अशा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी अकराच्या आत घरात असतात. रणरणत्या उन्हामुळे शहरातील विविध भागातील रस्ते दुपारी सूनसान दिसतात. एकीकडे प्रखर उन्हाळा असताना अजूनही ग्रामीण आणि शहरातील काही भागात वीज जाण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अनेकांना असह्य़ उकाडय़ाचा त्रास सहन करावा लागतो. शहरातील शीतपेयांच्या गाडय़ांभोवती लोकांची गर्दी दिसून येत आहे.
विदर्भात तापमान
विदर्भात चंद्रपूर ४३.२ अंश से., ब्रह्मपुरी ४२.७, वर्धा ४२.९ नागपूर ४२.८.२, अकोला ४२, अमरावती ४२.८, बुलढाणा ४१.२, गोंदिया ४०.१, वाशीम ४०, यवतमाळ ४०.४ अंश सें. तापमान नोंदवले गेले आहे. वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्याबरोबरच निसर्गावरही परिणाम झाला आहे. पशु व पक्ष्यांच्या संख्येतही घट जाणवू लागली आहे.