कल्याण-डोंबिवली शहर परिसरातील वीज ग्राहकांना पाचशे ते हजार रुपयांपर्यंत वाढीव रकमेची वीज देयके महावितरणकडून पाठवण्यात आल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्राहकांना नियमित २५० ते ४०० रुपये येणारे वीज देयक थेट ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत महावितरणकडून पाठवण्यात आले आहे. महावितरणकडून कोणतीही दरवाढीची घोषणा झाली नसताना अचानक वाढीव दराची वीज देयके आल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. हेच का ‘अच्छे दिन’ असे प्रश्न उद्विग्नपणे ग्राहकांकडून विचारले जात आहेत. महावितरणकडून ग्राहकांना नोव्हेंबर ते डिसेंबर या एक महिन्याची वीज वापराची देयके पाठवण्यात आली आहेत. या देयकांमध्ये वीज दरवाढ झाल्याची कोणतीही सूचना नाही. वीज दर कोष्टकामधील आकडेवारी कायम आहे. असे असताना मग वीज देयक वाढीव का आले, याविषयी ग्राहकांमध्ये संभ्रम पसरला आहे. एका विश्वसनीय सूत्राने सांगितले की, काँग्रेस आघाडी सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा सत्तेवर येण्यासाठी घोषणांचा सपाटा लावला होता. या काळात महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला १५ टक्के वीज दरवाढ करण्यास परवानगी दिली होती. आघाडी सरकारने या वीज दरवाढीला विरोध करून आपण ग्राहकांच्या बाजूचे आहोत आणि मतपेटीवर डोळा ठेवून वीज नियामक आयोगाच्या दरवाढीला विरोध करून महावितरणाला वीज दरवाढ करण्यास रोखले. वाढीव दरवाढीचा सुमारे सातशे ते आठशे कोटीचा बोजा शासन उचलेल, असे शासनाकडून महावितरण कंपनीला सांगण्यात आले होते. त्यामुळे नियामक आयोगाने दरवाढ सुचवून महावितरणने राजकीय हस्तक्षेपामुळे वीज दरवाढ केली नाही. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत ग्राहकांची अनुदानित रक्कम आघाडी सरकारने भरणा केली. परंतु, राज्यात सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेच येताच या शासनाने पहिल्या दणक्यात आघाडी सरकारने विजेवर अनुदान देण्याचा निर्णय रद्द केला. त्यामुळे ग्राहकांना वीजदरात मिळणारी १५ ते २० टक्के सूट रद्द झाली. वीजदराचे अनुदान रद्द झाल्यामुळे ग्राहकांवर वाढीव रकमेचा बोजा पडत आहे, असे सूत्राने सांगितले.
महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले, वीज नियामक आयोगाने महावितरणला पंधरा टक्के दरवाढ करण्यास पाच महिन्यांपूर्वी परवानगी दिली होती. ही दरवाढ लागू करण्यास तत्कालीन शासनाने नकार दिला. त्या बदल्यात महावितरणाला अनुदान देण्याचा निर्णय घेतला. विजेचे अनुदान देण्याची पद्धत नवीन सरकारने रद्द केल्यामुळे दरवाढीचा बोजा ग्राहकांवर वीज देयकाच्या माध्यमातून पडण्यास सुरुवात झाली आहे. एका विश्वसनीय सूत्राने सांगितले, अलीकडे ग्राहकांच्या मागणीवरून ‘आरएफ, ‘आयआर’ नावाचे वीज मीटर लावले जातात. त्या वीज मीटरमध्ये काही दोष आहेत. हे मीटर वेगाने फिरतात. त्यामुळेही ग्राहकांना वीज देयक वाढीव येत आहेत. अनेक ग्राहकांच्या मीटरविषयी तक्रारी आहेत, असे सूत्राने सांगितले.
वाढीव वीज देयकांमुळे ग्राहक हैराण
कल्याण-डोंबिवली शहर परिसरातील वीज ग्राहकांना पाचशे ते हजार रुपयांपर्यंत वाढीव रकमेची वीज देयके महावितरणकडून पाठवण्यात आल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
First published on: 10-01-2015 at 07:31 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy electricity bill in in kalyan dombivali