शहर व परिसरात उष्णतेच्या लाटेचा आलेख चढता असून गुरुवारी ४२ अंशापुढे पारा गेल्याने टंचाईच्या संकटाने हैराण मनमाडकरांची अधिकच होरपळ झाली. सध्या टँकरची ३४१ पर्यंत पोहोचली असून ही संख्या लवकरच ४०० चा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
चार दिवसांपासून शहर व परिसर उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. दोन दिवसांपूर्वी परिसरात काहीसे ढगाळ वातावरण आणि ऊन-सावलीचा खेळ सुरू झाल्यामुळे चटके कमी झाले होते, परंतु सध्या त्यात प्रचंड वाढ झाली आहे. उकाडय़ाने शहरवासीयांना हैराण केले आहे. पारा ४२ अंशांवर गेल्याने अंगाची लाहीलाही होत असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सकाळी सातपासूनच उन्हाची तीव्रता जाणवण्यास सुरुवात होत असून दुपारी बहुतांश रस्त्यांवर सामसूम निर्माण होते. सायंकाळी सहानंतर काही प्रमाणात रस्त्यांवर गर्दी दिसण्यास सुरुवात होते. काँक्रीटच्या घरांमध्ये तर रात्रीही उष्णता जाणवत असल्याने झोपेचे पार खोबरे होत आहे. दिवसेंदिवस उष्णता वाढत असताना टंचाईच्या संकटातही भर पडत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत मनमाडची तहान भागू शकेल, अशी व्यवस्था पालखेडच्या पाण्याने करण्यात आली असली तरी परिसरात टँकरची संख्या आताच ३४१ पर्यंत पोहोचली आहे. परिसरांमधून प्रस्ताव येतच असल्याने हा आकडा लवकरच ४०० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ७१ विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ३१२ गावे आणि ७७१ वाडय़ांना पाणीपुरवठा केला जात आहे. ३७ शासकीय आणि ३०४ खासगी टँकरचा यासाठी वापर केला जात आहे. गेल्यावर्षी सर्वाधिक १८३ पर्यंत टँकर्सची संख्या पोहोचली होती. त्या तुलनेने आताच ही संख्या दुप्पट झाली आहे. तालुकानिहाय टँकरची संख्या पुढीलप्रमाणे- येवला २६, नांदगाव ५८, चांदवड १६, देवळा ५८ अशी आहे.
टंचाईग्रस्त मनमाडकरांची उष्णतेच्या लाटेने होरपळ
शहर व परिसरात उष्णतेच्या लाटेचा आलेख चढता असून गुरुवारी ४२ अंशापुढे पारा गेल्याने टंचाईच्या संकटाने हैराण मनमाडकरांची अधिकच होरपळ झाली. सध्या टँकरची ३४१ पर्यंत पोहोचली असून ही संख्या लवकरच ४०० चा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
First published on: 24-05-2013 at 01:11 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy heat in water shortage time