मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला या आर्थिक वर्षांत एकूण २ हजार ४११ कोटी ३८ लाख रुपये उत्पन्न झाले असून ते गेल्या वर्षांच्या तुलनेत २९.५ टक्के अधिक असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांनी विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत दिली.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीतील रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची बैठक आज रेल्वे कार्यालयात झाली. विभागीय व्यवस्थापक बृजेश दीक्षित या समितीचे अध्यक्ष आहेत. या आर्थिक वर्षांत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला एकूण २ हजार ४११ कोटी ३८ लाख रुपये उत्पन्न झाले. गेल्यावर्षी १ हजार ८६१ कोटी ७२ लाख रुपये उत्पन्न झाले होते. यंदा २९.५ टक्के उत्पनात वाढ झाली. प्रवासी वाहतुकीतून ३३२ कोटी ३५ लाख रुपये, माल वाहतुकीमधून २ हजार २६ कोटी ४८ लाख रुपये, इतर वाहतुकीतून ४४ कोटी ५५ लाख रुपये, तिकीट तपासणीतून ८ कोटी ४५ लाख रुपये प्राप्त झाले. प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण ४ कोटी २३ लाख रुपये खर्च झाले. प्रस्तावित शिल्लक कार्य पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न आहेत. उन्हाळा तसेच सणांच्या कालावधीत प्रवाशांची गर्दी लक्षात घेता २१ (दुहेरी) गाडय़ा चालविण्यात आल्या. १९ उन्हाळी विशेष गाडय़ा सुरू आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ४०६ वातानुकूलित, २८७ द्वितीय श्रेणी, असे एकूण ६९३ अतिरिक्त डबे जोडण्यात आले, अशी माहिती बृजेष दीक्षित यांनी दिली.
संजय धर्माधिकारी, गोकुलदास डोंगरे, अरुण दुधे, कैलास बालपांडे, अतुल हंबर्डे, दामोदर मंत्री, दिनेशकुमार त्रिवेदी, मनोज बिर्ला, शिवरतन डागा, अनिल चौधरी, कैलास जोगानी या सदस्यांनी प्रस्ताव सादर केले. क्षेत्रीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी अतुल कोटेचा यांची मतदानाद्वारे निवड झाली. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे अतिरिक्त व्यवस्थापक उदय बोरवणकर, वरिष्ठ व्यवस्थापक सत्येंद्रकुमार, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एन. पिंपरीकर, वरिष्ठ वित्त व्यवस्थापक रामानंद भगत, वरिष्ठ यांत्रिक अभियंता आर. के. द्विवेदी, वरिष्ठ अभियंता डी. आर. टेंभुर्णे, वरिष्ठ सिग्नल व दूरसंचार अभियंता मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ विद्युत अभियंता सत्येंद्र सिन्हा, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी बी. के. पाणीग्रही, अभियंता (मुख्यालय) विलास पैठणकर, परिचालन व्यवस्थापक टी. एस. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव, सहायक सुरक्षा आयुक्त डी. चौबे, जनसंपर्क अधिकारी प्रमोद पाटील उपस्थित होते. वाणिज्य व्यवस्थापक बी. एल. कोरी यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा