विदर्भाच्या प्रवेशद्वाराशी असलेली, जैवविविधता, भौगोलिक निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेली बुलढाणा जिल्हयातील ज्ञानगंगा, अंबाबरवा, लोणार सरोवर परिसर ही अभयारण्ये निसर्ग, वन आणि  पर्यावरण पर्यटन क्षेत्रे म्हणून विकसित करण्याची फार मोठी आवश्यकता आहे. केंद्र शासनाने सन १९९७ ला ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्याचा व त्याच काळात राज्यशासनाने विज्ञानाचे ज्ञानतीर्थ असलेल्या लोणार सरोवर परिसराला पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला असला तरी गेल्या पंधरा वर्षांत केंद्र व राज्य शासनाच्या अदूरदर्शी कारभारामुळे ही अभयारण्ये कागदी घोडे नाचविण्यापुरती मर्यादित झाली आहेत.  
बुलढाणा-खामगाव या मार्गावर बुलढाण्यापासून दहा किलोमीटर अंतरावर वरवंड पासून रोहण्यापर्यंत २०६ चौ.कि.मी. क्षेत्रफळाचे विस्तीर्ण असे ज्ञानगंगा अभयारण्य आहे.  हे अभयारण्य निसर्गाचे जणू वरदानच आहे. अभयारण्यात साग, धावडा, मोईन , सुर्या, कळंब, इंजर, बिजा, मोहा, चारोळी, चिंच, आवळा, बेहडा, अंजन , बेल, सालई आदी मोठी झाडे आढळतात. निरगुडी, बोराटी, आमटी, रायमोनीया, भराटी ईत्यादी झुडपे तसेच तिखाडी, मारवेल, कुसळी, पवण्या, कुंदा इत्यादी गवत प्रजाती आणि गुळवेल, पिवळवेल, धामणवेल इत्यादी वेलींची उपलब्धता या अभयारण्यात आहे.
अभयारण्यांत बिबट, रान मांजर, जंगली कुत्रा, तडस, लांडगा, राण डुक्कर, निलगाय, भेडकी, चौशिंगा, माकड, वटवाघुळ, अस्वल, इत्यादी प्राण्यांचे वास्तव्य आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी नाग, धामण, मण्यार, घोरपड, अजगर, सरडे तसेच मोर, घुबड, पोपट, सुगरण, तितर, खंडया, सुतार, कबुतर, पानक ोंबडी, पिळक, टकाचोर व सॅन्ड पायपर, व्ॉगटेक (धोबी) इत्यादी स्थलांतरित पक्षी अभयारण्यात आढळतात.
 सातपुडयाच्या पायथ्याशी जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यात ज्ञानगंगा अभयारण्यासारखे पण त्यापेक्षा समुद्रसपाटीपासून अधिक उंच असलेले अंबाबरवा अभयारण्य आहे. लोणार सरोवराच्या आजुबाजूला विविध देवालयांच्या दहा ते बारा किलोमीटर परिसरात सुंदर असे पक्षी अभयारण्य आहे. हे अभयारण्य विज्ञान, निसर्ग, पर्यावरण व पौराणिक वास्तू यांचा समावेश असलेले परिपूर्ण पर्यटन केंद्र होऊ  शकते.  
या सर्व अभयारण्यात निसर्ग व पर्यावरण पर्यटनाला प्रचंड वाव आहे. त्यासोबतच या अभयारण्यात असलेल्या वृक्षवल्ली व वन्यप्राण्यांमध्ये वाढ करून पर्यावरण पूरक जैव विविधता जोपासण्यासही मोठी संधी आहे. यासर्व अभयारण्यात साधारणत: ६०० ते९०० मिमी. पाऊस पडतो. एवढा पाऊस पडूनही तेथील पाणवठे कोरडे राहतात. उन्हाळयात पानगळीने अभयारण्ये ओसाड व बोडखी होतात. अभयारण्याचा हिरवाबाज जोपासण्यासाठी येथे वनजलसंधारणाची अत्यंत आवश्यकता आहे. या अभयारण्यातील विविध पर्यटन स्थळे उपलब्ध नद्या व वनजलसंधारणाद्वारे विकसीत होऊ शकतात. वनजलसंधारणाद्वारे अभयारण्यातील पाणवठे उन्हाळयात कोरडे होणार नाहीत, असा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा