लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले असताना रामटेकच्या गडासाठी काँग्रेस, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षामध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली असून प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवार पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मिळविण्यासाठी ‘फिल्डींग’ लावण्याचा प्रयत्न करीत आहे. कधीकाळी वनवासात असताना प्रभू रामचंद्राच्या आणि महाकवी कालिदासाच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या रामटेकची ओढ अनेक नेत्यांना लागली असून त्यासाठी अनेक नेते सक्रिय झाले आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मुकुल वासनिक यांनी शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांचा पराभव केला होता त्यामुळे यावेळी सुद्धा रामटेकचा गड काँग्रेसकडे राहावा यासाठी ग्राामीण भागात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा फोर्स तयार करण्यासाठी तीन दिवसीय कार्यकत्याचे शिबिर आयोजित करण्यात आले असून दिल्लीतील अनेक नेते मार्गदर्शनासाठी येणार आहे. काँग्रेसकडून यावेळी रामटेकची जागा मुकुल वासनिकांना की अन्य कोणत्या नेत्याला मिळणार हे अद्याप निश्चित झाले नसले तरी अनेक नेत्यांनी त्यासाठी दावे केले आहे. उत्तर नागपूरचे आमदार आणि राज्याचे रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी रामटेकमधून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे. नितीन राऊत आतापर्यंत तीन वेळा उत्तर नागपुरातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. दलित मतदारांवर त्यांचा पगडा जास्त असला तरी इतर जाती धर्माचे मतदारही त्यांच्या पाठिशी आहेत. मात्र दिल्लीमध्ये वासनिक यांचेपारडे जड असल्यामुळे राऊत यांना कसा प्रतिसाद मिळतो हे येणारा काळ ठरविणार आहे.
उमेदवारीबाबत मात्र काँग्रेसकडून अनिश्चितता असली ग्रामीण भागात काँग्रेसमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामधील असलेले हेवेदावे आणि नाराजी दूर करण्यासाठी तीन दिवसाचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रामटेकच्या गडावर लक्ष ठेवून असलेले शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सक्रिय झाले असून गेल्या तीन महिन्याच्या काळात विदर्भातील पाच शिवसेना नेत्यांनी मातोश्रीवर वारी केली आहे. रामटेकमध्ये शिवसेनेकडून प्रारंभी सुबोध मोहिते आणि प्रकाश जाधव यांनी शिवसेनेचा झेंडा रोवला होता मात्र, नारायण राणेंच्या पाठोपाठ मोहिते यांनी शिवसेनेला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे प्रकाश जाधव यांनी मोहिते यांचा पराभव केला होता. तूर्तास महायुतीमध्ये शिवसेनेकडे ही जागा कायम राहणार असल्याचे जवळपास निश्चित असल्यामुळे शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्यासाठी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहे.
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेनेच्या जिल्ह्य़ातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ‘वन टू वन’ संवाद साधला असून त्यासाठी अनेक नेते मुंबईला गेले होते.
सध्या शिवसेनेमध्ये जिल्हा अध्यक्षांच्या कार्यशैलीबाबत नाराजी असल्यामुळे एक गट त्यांना हटविण्यासाठी सक्रिय झाला असून त्यासाठी काही कार्यकर्ते मातोश्रीवर गेल्याची माहिती मिळाली. रामटेकसाठी कृपाल तुमाने आणि प्रकाश जाधव यांच्यापैकी एकाची उमेदवारी प्रबळ असली तरी शिवसेनेत आलेले ज. मो. अभ्यंकर, निवृत्त पोलीस अधिकारी श्याम गजभिये, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि राजीव पारवे हेसुद्धा उमेदवारीच्या यादीत बसले आहेत. राजीव पारवे हे एकेकाळी राजेंद्र मुळक यांचे निकटस्थ होते मात्र त्यांनी गेल्यावर्षी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपाचे आमदार सुधीर पारवे यांचे ते भाऊ असून त्यांचा उमेरडसह जिल्ह्य़ातील विविध भागात जनसंपर्क आहे. शिवसेनेकडून उमेदवारीसाठी अनेक नावे समोर येत असले तरी पक्षश्रेष्ठीचे पारडे कोणाकडे झुकले जाते, हे लवकरच चित्र स्पष्ट होईल.
दुसरीकडे युतीमध्ये रामटेकची जागा शिवसेनेकडे असली तरी आता युतीमध्ये आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष सहभागी झाल्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अध्यक्ष रामदास आठवले रामटेकमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. सुलेखा कुंभारे गेल्या काही वर्षांत युतीच्या संपर्कात असून त्यांनी दीड वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवाय भाजप माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याही त्या संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना त्यात रामटेकचा गड मात्र गेल्या काही दिवासत जास्तीच चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा