भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त उद्या (रविवारी) मराठवाडय़ात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुका, व्याख्याने आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. जयंतीनिमित्त शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर रहदारीचे नियोजन करण्यात आले असून, विविध मंडळांच्या वतीने सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहेत.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी मोठय़ा प्रमाणात भीमसागर अभिवादन करण्यास एकत्र येतो. सर्वत्र निळे झेंडे, भीमगीते, मिरवणुका असे उत्साही वातावरण असते. अभिवादनास सकाळी लवकर जमणारी गर्दी उशिरापर्यंत कायम असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नागसेनवन, एमजीएम परिसरासह शहरातील सर्वच महत्त्वाचे रस्ते, चौक, पुतळ्यांचा परिसर अभिवादनास सज्ज झाला आहे. सर्वपक्षीयांच्या वतीनेही आंबेडकर यांना अभिवादनासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे सकाळी ८ वाजता डॉ. जयदेव डोळे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. आमदार एम. एम. शेख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान, डॉ. अभिजित वाडेकर, डॉ. किशोर साळवे, डॉ. एस. के. हिंगोले, प्रा. राहुल मोरे, डॉ. मोहम्मद शफिक आदी उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस पक्षातर्फे सकाळी १० वाजता भडकल गेट येथील आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांच्या अध्यक्षास स्मृतिचिन्ह, केंद्र व राज्य सरकारांच्या विविध कल्याणकारी योजनांच्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन या वेळी करण्यात येईल. माजी खासदार उत्तमसिंह पवार, अरुण मुगदिया, आमदार डॉ. कल्याण काळे व एम. एम. शेख, जि. प. अध्यक्षा नाहिदाबानो पठाण, चंद्रभान पारखे, विरोधी पक्षनेता डॉ. जफर खान, डॉ. विमल मापारी आदी उपस्थित राहणार आहेत.
परभणीत प्रा. नरके यांचे व्याख्यान
परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात सकाळी १० वाजता प्रा. हरि नरके यांचे ‘फुले-आंबेडकर यांचे विचार’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. कुलगुरू डॉ. किशनराव गोरे यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. विश्वासराव शिंदे, संशोधन संचालक डॉ. गोवर्धन खंडागळे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोकजी ढवण आदी उपस्थित राहणार आहेत.
उद्या एमजीएममध्ये कार्यक्रम
महात्मा गांधी मिशन संचालित इंग्रजी व मराठी माध्यमाच्या डी. एड. विद्यालयात (डीटीएड) सोमवारी (दि. १५) नाटय़ संमेलनाध्यक्ष, नाटककार प्रा. दत्ता भगत यांचे ‘राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान होईल.
 एमजीएम क्लोव्हर डेल स्कूलच्या सांस्कृतिक सभागृहात सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होईल. एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, स्कूलच्या संचालिका डॉ. अपर्णा          कक्कड, प्राचार्य डॉ. आर. डी. कांबळे व डॉ. सुभाष कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा