महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ या व्यापक मोहिमेचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी स्वत: हातात झाडू घेऊन या कामाला सुरुवात केली. शिवाय अनेक मान्यवरांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन स्वच्छ भारतासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या अभियानाला मोठय़ा संख्यने प्रतिसाद मिळू लागला असून नेते, अभिनेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते, सरकारी अधिकारी हातात झाडून घेऊन स्वच्छतेसाठी प्रयत्न करू लागले आहेत. ठाण्यात मात्र या मोहिमेला हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या मासुंदा तलाव, स्टेशन परिसर, भाजी मार्केट, बाजारपेठ या भागांमध्ये कचऱ्याचे ढीग कायम आहेत. याशिवाय लोकांमध्येच पुरेसी जागृती नसल्याने ते कचराकुंडीऐवजी उघडय़ावर भर रस्त्यात कचरा टाकत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या लढय़ामुळे ठाण्याची ओळख असलेला मासुंदा तलाव अतिक्रमणांपासून वाचला. त्यांच्याच प्रयत्नांच्या रेटय़ाने मासुंदा तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले. सुशोभीकरणानंतर या तलावाचे रुपडे पालटले. परिसराला एक नवी झळाळी मिळाली होती. जागोजागी बांधण्यात आलेले घाट, तलावाच्या किनारी नागरिकांना बसण्यासाठी केलेली व्यवस्था, गणेश विसर्जनासाठी स्वतंत्र घाट आणि निर्माल्य टाकण्याची व्यवस्था यामुळे या भागातील अस्वच्छता कमी होऊ लागली होती. मात्र अलीकडे या तलावाकडे पुन्हा दुर्लक्ष होऊ लागल्याने परिसरातील अस्वच्छता वाढू लागली आहे. त्यास महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहेच, शिवाय नागरिकही बिनदिक्कतपणे आसपासचा कचरा या तलावाच्या काठावर फेकू लागले आहेत. त्यामुळे तलावातील पाणी अस्वच्छ होण्याबरोबरच परिसरात दरुगधी पसरू लागली आहे.
तलावाच्या पायऱ्यांवर कचऱ्यांचे ढीग आणि महापालिकेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या कचरा कुंडय़ा, निर्माल्य कलश मात्र रिकामे आहेत. तलाव परिसरात सायंकाळी लागणाऱ्या खाऊ गल्लीच्या गाडय़ा आणि त्यातील खरकटय़ाची अस्वच्छतेमध्ये भर पडत आहे. त्यामुळे येथे उंदीर, घुशींचा वावरही वाढू लागला आहे. मासुंदा तलाव परिसरामध्ये नाना नानी पार्क, अहिल्याबाई होळकर उद्यान, आणि जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील उद्यान अशी तीन उद्याने असून त्यांची अवस्थाही गंभीर आहे.
ठाणेकरांना स्वच्छता अभियान तसे नवे नाही. महापालिकेच्या वतीने स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे हरीत ठाणे ही मोहीम कायमस्वरूपी राबविण्यात येत आहे. मात्र अगदी मध्यवर्ती ठिकाणी असणारा मासुंदा तलावही या मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छ राहू शकलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापौरांच्या सूचनाही केऱ्याच्या टोपलीत ?
ठाण्याच्या महापौरांनाही शहराच्या दौऱ्यात या अस्वच्छतेचे दर्शन घडले. त्यामुळे त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना जाब विचारला. तसेच तातडीने कचरा उचलून स्वच्छता राखण्याचे आदेश त्यांनी दिले. मात्र त्यांच्या सूचनांनंतरही अस्वच्छता काही हटलेली दिसत नाही.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy quantity of garbage in thane cities masunda lake area