गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या  संततधार पावसामुळे पनगंगा नदीसह  इतर नद्या-नाल्यांना मोठय़ा प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठची शेती खरडून वाहून गेली. शिवाय, तालुक्यातील  हजारो हेक्टर शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यात सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आदी प्रमुख पिकांचा  समावेश आहे.
अगोदरच कर्जबारीपणा दुबार-तिबार पेरण्यांमुळे त्रस्त असलेल्या  शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तालुक्यातील पावसाच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या शेतीचा सव्‍‌र्हे करुन शेतकऱ्यांना योग्य ती मदत शासनाकडून त्वरित मिळावी, अशी मागणी होत आहे. इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पनगंगेला सतत पूर गेले. याचदरम्यान तालुक्यातील नाले-ओढे यांनाही  गेल्या २० वर्षांपासून कुणीही न पाहिलेला पूर यावर्षी दिसून आला.  पनगंगेच्या काठावरील झाडगाव, तिवरंग, मुळावा, हातला, दिवटिपपरी पळसी, नागापूर, बेलखेड, बारासंगम, मालेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, टाकळी, चालगणी, साखरा, खरुस, लोहरा, कारखेड, देवसरी, दिघडी आदी गावांना पावसाने झोडपल्याने या गावांमधील शेती व पिकांचे नुकसान झाले आहे.
आमदार विजय खडसे यांनी विधान भवनात तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, तसेच तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. तहसीलदार सचिन शेजाळ यांनी कृषी विभागाची तत्काळ बठक घेऊन शेतातील पिकांची पाहणी करून सव्‍‌र्हे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतात आजही मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहेत. शेतमजुरांना सध्या कामे नसल्याने त्यांच्यावरही उपासमारीची पाळी आली आहे. अजूनही पावसाळा  संपायला बराच कालावधी असल्याने शेतकऱ्यांसमोर टांगती तलवारच आहे.

Story img Loader