मागील दहा-बारा दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाचे चित्र ख-या अर्थाने पुसले गेले आहे. विशेषत दुष्काळाचा शाप असलेल्या सांगोला आणि मंगळवेढा या दोन तालुक्यात वरुणराजाने कृपा केल्याने तेथील जनतेला दिलासा मिळाला आहे.
पावसाची सरासरी शंभर टक्के गाठल्याने जिल्हा टँकरमुक्तीच्या मार्गावर आहे. गेल्या उन्हाळ्यात दुष्काळाच्या संकटात ७०० पेक्षा अधिक टँकर चालत होते. परंतु आता ही संख्या नाममात्र २१ वर आली आहे.
१ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात जिल्ह्यात एकूण ५३७७.१ मिलिमीटरप्रमाणे ४८८.८३ मिमी सरासरी पाऊस पडतो. यंदाच्या पावसाळ्यात आजतागायत एकूण सरासरी पावसापकी ४८४.३७ मिमी इतका सरासरी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १४४ टक्के पाऊस माळशिरसमध्ये, तर १२१.०८ टक्के पाऊस माढय़ात पडला आहे. सदैव दुष्काळी असणा-या सांगोला तालुक्यात १०७.३६ टक्के पाऊस पडल्याने तेथील जनतेला सुखद दिलासा मिळाला आहे. मंगळवेढय़ातील सरासरी पावसाची टक्केवारी ८४.३४ इतकी झाली आहे. पंढरपुरात १०१.७७ तर करमाळ्यात १०१.४० टक्के पावसाने हजेरी लावल्याने तेथील शेतकरी सुखावला आहे. मोहोळ ९८.८० टक्के, बार्शी ९३.१४ टक्के, उत्तर सोलापूर ९२.१३ टक्के, दक्षिण सोलापूर ८२.८० टक्के, अक्कलकोट ८१.८२ टक्के याप्रमाणे अन्य तालुक्यांमध्ये पाऊस झाल्याने शेतक-यांची चिंता मिटली आहे. गतवर्षी दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर याच कालावधीत एकूण सरासरीपकी केवळ २६७.२७ मिमी इतकाच पाऊस झाला होता.
यंदाच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील दुष्काळाचे संकट दूर होण्यास चांगलीच मदत झाली असून एरव्ही ‘टँकरग्रस्त’ म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आता ‘टँकरमुक्त’ होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या उन्हाळ्यात भीषण दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात सातशे पेक्षा अधिक टँकरने दुष्काळग्रस्त जनतेची तहान भागविली जात होती. परंतु आता पावसाने जोमदार साथ दिल्याने टँकरची संख्या केवळ २१ वर पोहोचली आहे. सुखद बाब म्हणजे सांगोल्यात सध्या एकही टँकर चालत नाही. मंगळवेढय़ात १६ तर माढय़ात ३ आणि दक्षिण सोलापुरात २ याप्रमाणे २० गावे व १३४ वाडय़ांतील ४९ हजार ६२५ लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.