सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने वर्धा, इरई व झरपट नदीला पूर आल्याने नदी काठावरील गावात पाणी शिरले आहे, तर शहरातील रहमतनगर, सिस्टर कॉलनी, राजनगर, ठक्कर कॉलनी, बिनबा प्रभागात पुराचे पाणी शिरल्याने ५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पुलावर पाणी असल्याने अहेरी, वरोरा, राजूरा मार्ग दोन दिवसापासून बंद आहे, तर हजारो एकर शेतीतील पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ही पूर परिस्थिती बघता इरई धरणाचे सातही दरवाजे बंद करण्यात आले असून जिल्हा प्रशासन व मनपाचे आपत्ती व्यवस्थापन सक्रीय झाले आहे.
या शहरात, तसेच जिल्ह्य़ात गेल्या ४० दिवसात विक्रमी सरासरी ७४२ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. सोमवार व मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने इरई, वर्धा व झरपट, या तिन्ही नद्या दुथडी भरून वाहत असून इरई धरणाचे सातही दरवाजे सलग चोवीस तास उघडे असल्याने दाताळा मार्गावरील पुलावरून पाच फूट पाणी असल्याने दाताळा-चंद्रपूर शहराचा संपर्क तुटला आहे. धरणाचे पाणी नदी काठावरील दाताळा, खुटाळा, भटाळी, किटाळी, नांदगाव, माना, आरवट, चारवट, हडस्ती, लखमापूर, पदमापूर, मासळ, नेरी, कोसारा, मारडा, शिवनी या गावात शिरल्याने जिल्ह्य़ाचा संपर्क तुटला आहे. या गावातील शेकडो लोक बेघर झाले असून अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने लाखोचे नुकसान झाले आहे. नदी काठावरील शेतात पुराचे पाणी शिरल्याने हजारो एकरातील सोयाबीन, कापूस, धानाचे पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून पावसाच्या पाण्याने डोळ्यात अश्रू आणले आहे.
या जिल्ह्य़ात २००६ नंतर इतका प्रचंड पूर आला असून वरोरा, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर व ब्रम्हपुरी या तालुक्यांनाही फटका बसला आहे. २४ तासात वरोरा तालुक्यात विक्रमी ११४.६ मि.मी. पाऊस झाल्याने वरोरा व परिसरातील गावात पुराचे पाणी शिरले असून लोकांचे प्रचंड हाल होत आहे. हीच स्थिती राजूरा तालुक्यातही असून नदी काठावरील अनेक गावात पाणी शिरल्याने लोक बेघर झाले आहेत. तसेच पुराचे पाणी शहरात आल्याने शेकडो घरात पाणी आहे. कोरपना तालुक्यात ११४.२, तर जिवती तालुक्यात १०५.४ मि.मी. पाऊस झाला आहे. इरईचे सात दरवाजे २४ तासापासून उघडे असल्याने चंद्रपुरातील अनेक प्रभागांना पुराचा फटका बसला आहे. रहमतनगर, सिस्टर कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, ठक्कर नगर, वडगाव, विठ्ठल मंदिर वॉर्ड, भंगाराम वॉर्ड, राजनगर, जगन्नाथबाबानगर, महसूल कॉलनी, केंद्रीय उत्पादन शुल्क कॉलनी, बिनबा वॉर्डातील शेकडो घरात पाणी शिरल्याने टी.व्ही., फ्रिजसह इतरही अनेक महागडय़ा वस्तू पुराच्या पाण्यात आहेत.
रहमतनगरातून ३०० लोक, पठाणपुरा गेटबाहेरील राजनगर १५०, सिस्टर कॉलनी १००, विठ्ठल मंदिर प्रभागातून १५, तर इतर प्रभागातून २५ जणांना सुरक्षित स्थळी किदवाई हायस्कुल, महात्मा ज्योतिबा फुले हायस्कुल, टागोर विद्यालयात हलविण्यात आले आहे. रहमतनगर व बिनबा प्रभागात अनेक जण पुराच्या पाण्यात फसले असून जिल्हा प्रशासन व मनपाचे आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी मोटर बोटच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढत आहेत.  पठाणपुरा गेट, बिनबा गेट, विठ्ठल मंदिर खिडकीपर्यंत पाणी पोहोचल्याने प्रभारी जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार, मनपा आयुक्त प्रकाश बोखड यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून तातडीने मदतकार्य सुरू केल्याने मोठी हानी टळली. वर्धा नदीला पूर आल्याने घुग्घुस शहरातील अनेक प्रभागात पाणी शिरले आहे, तर वढा, बेलसनी, पांढरकवडा, भोयेगाव, हनुमान मंदिर, पिंपरी या गावांना पाण्याने वेढलेले आहे. याच नदीवर ठिकठिकाणी पाणी असल्याने राजुरा, अहेरी, वरोरा मार्ग सलग दोन दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे परिवहन मंडळाच्या बसफेऱ्याही बंद असून लाखोचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी वाढत असल्याचे बघून दुपारी १.१५ वाजता इरई धरणाचे सातही दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी. बडकेलवार यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. त्यामुळे आता पूर परिस्थिती लवकरच ओसरेल, असेही ते म्हणाले. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या सर्व लोकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तिकडे मुसळधार पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाण्याची पातळी झपाटय़ाने वाढत आहे.
 जिल्ह्य़ातील ११ सिंचन प्रकल्पांपैकी चंदई, चारगाव, अंमलनाला, लभानसराड, पकडीगुड्डम व दिना प्रकल्प शंभर टक्के भरले असून घोडाझरी ९७ टक्के भरलेला आहे. नलेश्वर ८१ व डोंगरगाव ९१ टक्के भरला असून आसोलामेंढा तलावात ४३ टक्के पाणी साठा आहे. येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता नदी काठावरील गावांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा