या जिल्ह्य़ात व शहरात सलग दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वष्रेभरात पडणारा पाऊस अवघ्या तीन महिन्यात पडल्याने आणखी पाऊस नको, असे म्हणण्याची वेळ चंद्रपूरकरांवर आली आहे.
उन्हाळ्याप्रमाणेच यंदा जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा २०० टक्के पाऊस जास्त झालेला आहे. या जिल्ह्य़ाची पावसाची सरासरी ११४२ मि.मी. आहे. परंतु, यंदा वष्रेभरात पडणारा पाऊस अवघ्या तीन महिन्यात कोसळला. आज सरासरी १५५६ मि.मी. पाऊस झालेला आहे. या आठवडय़ातही पावसाने चंद्रपूरकरांचा पिच्छा काही केल्या सोडलेला नाही. जून व जुलै महिन्यातील अतिवृष्टी व मुसळधार पावसानंतर ऑगस्टमध्येही पावसाची रिपरिप सुरूच आहे. १५ ऑगस्टला एक दिवसाची विश्रांती दिल्यानंतर १६ ऑगस्टला मुसळधार पाऊस झाला. तेव्हापासून पावसाची झड सुरूच आहे. मध्ये एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा सलग दोन दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे. काल बुधवारी दिवसभर रिमझीम पाऊस सुरू होता. त्यानंतर मध्यरात्रीही चांगला पाऊस झाला. यानंतर आज सकाळी पावसाने थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पावसामुळे या जिल्ह्य़ात शेती व घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता साधा पाऊस सुरू झाला तरी लोकांच्या मनात धडकी भरते इतक्या जास्त पावसाची नोंद यंदा झाली आहे. सलग दोन दिवसापासून पाऊस सुरू असल्याने किमान आता तरी उघडीप दे, अशी प्रार्थना करण्याची वेळ आली आहे. वष्रेभरात पडणारा पाऊस तीन महिन्यात पडल्याने आणखी पाऊस नको, असे म्हणण्याची वेळ चंद्रपूरकरांवर आली आहे. पावसाला लोक कंटाळले असून आता उन्हाची प्रतीक्षा करत आहेत.